सामना संपताच कर्णधाराने केला मोठा खुलासा; ब्रायन लाराचा अंदाज खरा ठरविला!

    25-Jun-2024
Total Views | 111
afganistan won enters semi final


नवी दिल्ली :      बांग्लादेशविरुध्द झालेल्या रोमहर्षक लढतीत अफगाणिस्तानने दणदणीत विजय मिळवित नवा इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानच्या संघाने पहिल्यांदाच विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. कप्तान राशिद खानच्या नेतृत्वात संघाने बांग्लादेशवर ०८ धावांनी विजय मिळविला. सामना संपल्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राशिदने मोठा खुलासा केला आहे.

सेमी फायनलमध्ये धडक मारल्यानंतर कप्तान राशिद खानने माध्यमांशी संवाद साधला आहे. राशिदने म्हटले की, "मला वाटते की आम्ही एका व्यक्तीचं म्हणणं सिध्द करून दाखविले आहे. वेस्ट इंडिजचा माजी तडाखेबाज फलंदाज ब्रायन लारा याने उपांत्य फेरीत दाखल होणाऱ्या संभाव्य संघात अफगाणिस्तानचा संघ अव्वल चारमध्ये येण्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर आम्ही एका पार्टीत ब्रायन लाराला भेटलो तेव्हा त्यांना सांगितले की, आम्ही हे सिध्द करू, असे सामन्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राशिद खानने सांगितले आहे.

सामन्यात पावसाचे व्यत्यय आल्याने बांग्लादेशला डीएलएस नियमांनुसार १९ षटकांत ११४ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. राशिद खान आणि नवीन-उल-हक यांच्या भेदक माऱ्यासमोर बांग्लादेशचा पूर्ण संघ ढेपाळला. लिटन दासने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी केली. पंरतु, संघाला सेमी फायनलपर्यंत घेऊन जाण्यात सहकाऱ्याची साथ मिळविण्यात त्याला सपशेल अपयश आले.

टी-२० विश्वचषकात उपांत्य फेरीत चार संघ झाले आहेत. अफगाणिस्तानने बांग्लादेशला ८ धावांनी नमवित सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. विश्वचषकाचा उपांत्य फेरीतील पहिला सामना दि. २६ जून रोजी अफगाणिस्तान विरुध्द दक्षिण आफ्रिका तर दुसरा सामना भारत विरुध्द इंग्लंड यांच्यात २७ जून रोजी होणार आहे.





अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121