कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीनंतर निलेश लंकेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14-Jun-2024
Total Views |
पुणे : खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता निलेश लंकेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला त्या व्यक्तीची पार्श्वभूमी माहित नसून कळत नकळत ही भेट झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
निलेश लंके म्हणाले की, "मी माझे दिल्लीचे काम आटोपून विमानतळावर आलो. आमच्या पवार नावाच्या सहकाऱ्यांचं कॅन्सरने निधन झालं. त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी मी तिथे गेलो. ती भेट झाल्यानंतर त्या भागातील आमचे पदाधिकारी प्रविण धनवे यांच्या घरी आम्ही भेट दिली. त्यानंतर गजा मारणेच्या घरासमोरून जात असताना आम्हाला ४ ते ६ लोकांनी थांबवलं आणि चहा प्यायला चला म्हणाले. तोपर्यंत आम्हाला कोणाची काय पार्श्वभूमी आहे याबद्दल माहिती नव्हती. त्यांनी माझा सत्कार केला. त्यानंतर तास दोन तासाने संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी कळली. तो एक अपघात असून नकळत चूक झाली आहे," असे ते म्हणाले.
अहमदनगर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार आणि शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं असून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.