भुजबळांनी जे केलं ते फार दुर्देवी आहे : मंत्री हसन मुश्रीफ
31-May-2024
Total Views | 103
कोल्हापूर : जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या कृत्यानंतर छगन भुजबळांनी जे केलं ते पार दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. या परिस्थितीत भुजबळांनी त्यांना खडेबोल सुनावले पाहिजे होते, असे ते म्हणाले. त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, "आव्हाडांनी मनुस्मृती जाळण्याचं ठरवलं तर मग त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो छापण्याची गरज काय? त्यांनी बाबासाहेबांचा फोटो फाडल्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी कितीही माफी मागितली तरी हे धुवून जाईल असं वाटत नाही. त्यांना प्रायश्चित घ्यावं लागेल," असे ते म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या कृत्यावर छगन भुजबळ त्यांच्या समर्थनार्थ बोलले. यावर प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ पुढे म्हणाले की, "आमचे नेते छगन भुजबळ यांनी मनुस्मृतीचा विषय बाजूला पडेल म्हणून पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं, हे अतिशय दुर्दैवी आहे. या परिस्थितीत त्यांनी आव्हाडांना खडेबोल सुनावले पाहिजे होते. अशा पद्धतीने केलं ते चुकीचं आहे असं त्यांना सांगण्याची आवश्यकता होती. भुजबळांनी जे केलं ते फार दुर्दैवी आहे," असेही ते म्हणाले.