डोंबिवली एमआयडीसी स्फोट प्रकरण ; मुख्य आरोपीला अटक!
24-May-2024
Total Views | 39
डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील रासायनिक कंपनीत स्फोट झाला होता. या अमुदान कंपनीच्या मालक मालती मेहता यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, ठाणे क्राईम ब्रांच व पंचवटी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईतून अटक करण्यात आली असून मालती मेहता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या मेहेरधाम परिसरातून नाशिक पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
दरम्यान डोंबिवली एमआयडीसीच्या फेज २ मधील अंबर कंपनीत सलग तीन स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरला. या डोंबिवलीतील दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून ४८ जण जखमी झाले. जखमींवर एम्स, नेपच्यून आणि ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत आणि सर्व प्रकारची मदत केली जात आहे.
"आग आटोक्यात आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. घटनास्थळी सर्व प्रकारच्या सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ यासारख्या यंत्रणांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. सदर आग आजूबाजूला पसरु नये यासाठीसुद्धा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले होते. त्याचबरोबर, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य करत म्हटले की, दुर्घटनेतील नेमकं कारण काय याबद्दलची माहिती घेतली जाईल आणि काही आढळल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल.
डोंबिवली येथील एमआयडीसी स्फोटातील मुख्य आरोपीला नाशिक येथील मेहेरधाम परिसरातून अटक करण्यात नाशिक आणि ठाणे पोलिसांना यश आले आहे. मालती प्रदीप मेहता असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती नाशिक पोलिसांनी दिली आहे.
स्फोट झाल्यानंतर आरोपी पोलिसांना गुंगारा देत फरार झाली होती. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्याशी संपर्क साधत आरोपी नाशिकमध्ये असल्याची माहिती दिली. लाईव्ह लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी मालती मेहता नाशिकमध्ये असल्याची माहिती ठाणे पोलिसांना समजली.
त्यानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने नाशिक गुन्हे अन्वेषण युनिट-1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि ठाणे गुन्हे अन्वेषण युनिट-4 या टीमने नाशिकच्या पंचवटी परिसरातून नातेवाईकांकडे आश्रय घेतलेल्या या आरोपीला अटक केली. दरम्यान, डोंबिवली येथे गुरूवार, दि. 23 मे रोजी रासायनिक कारखान्यात झालेल्या स्फोटात 11 जणांचा मृत्यु झाला, तर 60 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी कारखाना संचालक मालती प्रदीप मेहता हिचा पोलीस शोध घेत होते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही शोध मोहीम राबविण्यात आली.