रामनाथ गोयंकांच्या जयंतीनिमित्त मंत्री लोढांनी वाहिली आदरांजली!
18-Apr-2024
Total Views | 36
मुंबई : आपल्या निर्भीड पत्रकारितेने समाजाच्या विकासात योगदान देणारे इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्र समूहाचे संस्थापक रामनाथ गोयंका यांच्या जयंतीचे औचित्य साधून कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी गिरगाव येथील किलाचंद उद्यान येथे उभारलेल्या स्फूर्तीस्थळास भेट देऊन स्वर्गीय गोयंका यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
स्वर्गीय रामनाथ गोयंका यांनी आपल्या प्रभावी पत्रकारितेच्या माध्यमातून भारतीय राजकारणावर एक वेगळा ठसा उमटवला आहे. आणीबाणीच्या काळात जेव्हा इंदिरा गांधी यांच्या सरकारच्या विरोधातील जनतेचा आवाज दाबला जात होता. तेव्हा गोयंका यांनी एका योद्ध्याप्रमाणे निर्भयतेने इंडियन एक्स्प्रेसच्या माध्यमातून जनतेचा आवाज बनून काम केले. शेवटी सरकारला नमते घ्यावे लागले आणि आणीबाणी मागे घेतली गेली.
त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 'हिरोज ऑफ मुंबई' उपक्रमाच्या माध्यमातून गिरगावमधील किलाचंद उद्यान येथे तयार करण्यात आलेल्या स्फूर्तीस्थळी त्यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नातून 'हिरोज ऑफ मुंबई' या उपक्रमांतर्गत मुंबईच्या विकासामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या १८ महान विभूतींचे पुतळे किलाचंद उद्यानातील स्फूर्तीस्थळी उभारण्यात आले आहेत. १८ विभूतींच्या या मांदियाळीमध्ये आपल्या निर्भीड पत्रकारितेने समाजाच्या विकासात योगदान देणारे इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्र समूहाचे संस्थापक रामनाथ गोयंका यांचा देखील समावेश आहे. २२ फेब्रुवारी २०२४ रोजी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते या स्फूर्तीस्थळाचे लोकार्पण करण्यात आले होते.