‘इस्रो’च्या ‘पुष्पक’चे यशस्वी लँडिंग!

    22-Mar-2024
Total Views | 122
Isro successfully lands 'Pushpak'

नवी दिल्ली: (विशेष प्रतिनिधी) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शुक्रवारी पुन्हा वापरता येण्याजोगे लॉन्च व्हेईकलचे (आरएलव्ही एलईएक्स - ०२) यशस्वी लँडिंग केले.या स्वदेशी अंतराळयानाला ‘पुष्पक’ असे नाव देण्यात आले आहे. आरएलव्ही एलईएक्स – ०२ लँडिंग प्रयोगाद्वारे रीयुजेबल लॉन्च व्हेईकल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक मैलाचा दगड गाठला गेला आहे, असे इस्रोने म्हटले आहे. कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंज (एटीआर) मध्ये सकाळी 7.10 वाजता ही चाचणी घेण्यात आली. ‘पुष्पक’ उंचीवरून प्रक्षेपित केल्यानंतर अचूकतेने धावपट्टीवर यशस्वीरित्या उतरले. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने हे रॉकेट आकाशातून सोडण्यात आले.

‘पुष्पक’ रॉकेटचे हे तिसरे उड्डाण होते. यापूर्वी 2016 मध्ये ‘पुष्पक’ रॉकेटची पहिली चाचणी घेण्यात आली होती, तेव्हा ते बंगालच्या उपसागरात आभासी धावपट्टीवर उतरवण्यात आले होते. दुसरी चाचणी 2023 मध्ये झाली, जेव्हा ते लँडिंगसाठी चिनूक हेलिकॉप्टरमधून सोडले गेले. इस्रो या रॉकेटची सतत चाचणी करत आहे, जेणेकरून आव्हानात्मक परिस्थितीत त्याची क्षमता तपासता येईल.

‘पुष्पक’ची वैशिष्ट्ये

· ‘पुष्पक’ हे 6.5 मीटर लांब आणि 1.75 टन वजनाचे स्पेसक्राफ्ट रॉकेट आहे.

· अंतराळातून मोहिम पूर्ण करून रॉकेट पृथ्वीवर परतल्यावर त्याला एक थ्रस्ट देऊन हवे तेथे उतरविता येते.

· या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने 100 कोटी रुपये खर्च केले आहेत. पुन्हा वापरता येण्याजोगे रॉकेट तयार करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून भविष्यातील मोहिमांवर होणारा खर्च कमी करता येईल.

· ‘पुष्पक’ रॉकेटचा वापर भविष्यात प्रदक्षिणा करणाऱ्या उपग्रहांना इंधन भरण्यासाठीही करता येईल. याशिवाय अवकाशातील प्रदूषण कमी करण्याच्या भारताच्या मोहिमेचाही हा एक भाग आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121