भूषण गगराणी नवे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त!

नवी मुंबईसह ठाण्यालाही मिळाले नवे आयुक्त

    20-Mar-2024
Total Views |
BMC Commissionor Bhushan Gagrani


 
मुंबई :     इक्बालसिंह चहल यांना मुंबई पालिका आयुक्त पदावरून हटवल्यानंतर त्यांच्या जागी मराठमोळे अधिकारी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवार, दि. २० मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंबंधीचे आदेश जारी केले. नियुक्तीच्या ठिकाणी तीन वर्षे पूर्ण केल्यामुळे मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि पी. वेलारसू यांची बदली करावी.

तसेच त्यांच्या जागी नवीन नियुक्ती मंगळवारी सायंकाळपर्यंत करावी, असे आदेश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने आयुक्तपदासाठी मंगळवारी भूषण गगराणी, अनिल डिग्गीकर आणि संजय मुखर्जी यांची नावे पाठवली. त्यापैकी भूषण गगराणी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.


भूषण गगराणी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव पद सांभाळले होते. तसेच ठाकरे सरकारमध्ये कोरोना काळात त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे महायुती सरकारने त्यांच्यावर अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी दिली होती. आता ते मुंबईचा कारभार पाहतील. मुंबई पालिकेत सध्या प्रशासक राजवट असल्यामुळे गगराणी यांच्यासारख्या संवेदनशील अधिकाऱ्याची नियुक्ती योग्य असल्याच्या प्रतिक्रिया मुंबईकरांकडून व्यक्त केल्या जात आहेत.


नवी मुंबईत कैलास शिंदे, तर ठाण्यात सौरभ राव

केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांना हटवण्याचे आदेश दिल्यानंतर ठाणे आणि नवी मुंबईतही नवीन महापालिका आयुक्तांची बदली करण्यात आली. ठाणे पालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची बदली मुंबई पालिकेत अतिरिक्त आयुक्त पदी करीत त्यांच्या जागी सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, नवी मुंबई पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची बदली सहकार आयुक्तपदी करीत त्यांच्या जागी कैलास शिंदे यांना नेमण्यात आले आहे.





अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121