महापालिका रुग्णालयातील कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ थेट सेवेत?

कर्मचारी सेनेची मागणी

    20-Mar-2024
Total Views |
BMC Contractual Laboratory Technician



मुंबई :   
अत्यावश्यक सेवेअंतर्गत मुंबई महापालिका रूग्णालयात, कोविड काळातही जोखिम पत्करुन केवळ १८ हजार रुपये वेतन घेऊन काम करणाऱ्या कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ/सहाय्यक, ”क्ष” किरण तंत्रज्ञ/सहाय्यक, डायलिसिस तंत्रज्ञ/सहाय्यक, ब्लड बॅंक तंत्रज्ञ/सहाय्यक यांना पालिका सेवेत रिक्त पदी सामावून घ्यावे, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी केली आहे. त्यासाठी लवकरच ते पालिका आयुक्त व पालिका अतिरिक्त आयुक्तांना भेटणार आहेत.


हे वाचलंत का? -  ई-बाईकच्या बॅटरीचा स्फोट, घराची वाताहत होऊन ३ जण जखमी!

 

दरम्यान, बाबा कदम, डॉ. संजय बापेरकर यांच्यासमवेत सर्व रुग्णालयाच्या तंत्रज्ञांनी, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना युनियनच्या माटुंगा येथील कार्यालयात नुकतेच एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध विषयांवर चर्चा झाली. सुरुवातीला डॉ. संजय बापेरकर यांनी वरील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, यासाठी मुंबई पालिका उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, आयुक्त यांना पत्रव्यवहार करुन, हिंदुस्थान मजदूर संघ युनियनच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार केला आहे. तथापि, अद्याप याबाबत कोणतेही योग्य उत्तर संबंधितांकडून देण्यात आलेले नाही, असे यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, बाबा कदम यांनी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना पालिकेमध्ये कायमस्वरूपी घेण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची यासंदर्भात लवकरच भेट घेणार असल्याचे सांगितले.