ई-बाईकच्या बॅटरीचा स्फोट, घराची वाताहत होऊन ३ जण जखमी!
20-Mar-2024
Total Views |
ठाणे : घरात ठेवलेल्या रेबोल्ड कंपनीच्या ई-बाईकच्या लिथियम बॅटरीचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कळव्यात घडली. हा स्फोट इतका जबरदस्त होता की या घटनेत घराची भिंत व पत्रे कोसळल्याने लाल बादशाह (६६),मेहबूबी लाल बादशहा (५६) या दांम्पत्यासह कुसुमदेवी विश्वनाथ गुप्ता (२८) असे तिघे जण जखमी झाले.सर्व जखमींना उपचारार्थ कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कळवा, मफतलाल कंपाऊंड, शांतीनगर, या ठिकाणी सावित्रीदेवी वेल्फेअर सोसायटी या चाळीच्या रूम नं. ३१/२० चे मालक विश्वनाथ गुप्ता यांच्या घरामध्ये ठेवलेल्या ई-बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाला. त्यामुळे बाजूच्या रूम नं. ३१/२१चे मालक लाल बादशहा यांच्या घराची भिंत व पत्रे कोसळून तिघे जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अम्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
तसेच जखमींना कळवा,छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. यामध्ये गुप्ता यांच्या उजव्या पायाला तर लाल बादशाह यांच्या डोक्याला आणि हाता पायांना तर त्यांची पत्नी मेहबूबी यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
तर दोन्ही घराची संयुक्त भिंत तसेच छताचे पत्रे स्फोटामुळे कोसळली. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून घटनास्थळी धोकापट्टी बांधून तात्पुरत्या स्वरूपात दोन्ही घरे बंद करण्यात आली आहेत. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
जखमी घारीला मिळाले जीवदान
समता नगर येथील सिल्वर आर्क सोसायटी, पेरीन बाई इराणी मार्ग येथे एक जखमी अवस्थेत घार पडलेली निर्दशनास आली. त्या घारीला आपत्ती व्यवस्थापन कक्षाने पकडून आरएडब्ल्यूडब्ल्यू संस्थेच्या ताब्यात देत जीवदान दिले. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी समोर आल्यावर आपत्ती व्यवस्थापन कक्षाने धाव घेत,घारीला पकडून उपचारार्थ पशुवैद्यकिय दवाखान्यात दाखल केले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.