पाश्चिमात्य लेखक आपल्या साहित्यामधून ज्या अशा लोकविलक्षण प्रतिमा निर्माण करतात, त्या काल्पनिक नसतात. त्यांना प्रत्यक्षाचा सणसणीत आधार असतो. असाच एक प्रत्यक्ष चालता-बोलता कॅप्टन नेमो म्हणजे डॉ. जॉन क्रेव्हन.
ज्यूल्स व्हर्न हा १९व्या शतकातला प्रख्यात फे्ंरच विज्ञानकथा लेखक होता. ‘ट्वेंटी थाऊजंड लीग्ज अंडर द सी’ ही त्याची विज्ञान कादंबरी १८६९ साली प्रसिद्ध झाली. अटलंटिक महासागरात, अमेरिकेच्या पूर्व किनार्याजवळ एक भयंकर समुद्री प्राणी प्रवासी आणि व्यापारी जहाजं बुडवत सुटलेला असतो. अमेरिकन सरकारच्या आवाहनाला मान देऊन फे्ंरच समुद्रतज्ज्ञ प्रा. पिअरे ऑरोनॉक्स आणि कॅनडियन समुद्र शिकारी नेड लॅड हे न्यूयॉर्कजवळच्या बु्रकलिन बंदरातून त्या भयंकर समुद्री प्राण्याच्या मागावर निघतात. त्यांना आढळतं की, तो समुद्रसैतान म्हणजे ‘नॉटिलस’ नावाची पाणबुडी आहे आणि तिचा प्रमुख कॅप्टन नेमो हा स्वत:च एक महान समुद्र वैज्ञानिक आहे.त्या काळात पाणबुडी हा नौका प्रकार अतिशय प्राथमिक अवस्थेत होता. युरोपातल्या प्रगत देशांची नौदलं आणि अमेरिकन नौदल, प्रगत पाणबुडी बनवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होती. अशा त्या काळात ज्यूल्स व्हर्नने कॅप्टन नेमोच्या तोंडून ‘नॉटिलस’ पाणबुडीचे जे शास्त्रीय नि तांत्रिक तपशील वदवले आहेत, ते थक्क करून टाकणारे आहेत. ज्यूल्स व्हर्न हा द्रष्टा, भविष्यवेधी लेखक होता, हे त्यावरून सिद्ध होतं. शिवाय समुद्रतळाशी असलेले अद्भुत विश्व ज्यूल्स व्हर्नने फार विस्ताराने या कादंबरीत मांडलं आहे.
आधुनिक काळात इयान फ्लेमिंग या ब्रिटिश लेखकाने आणखी एक पाऊल पुढे टाकलं. ‘थंडरबॉल’ या आपल्या कांदबरीत त्याने असं दाखवलं की, ‘नाटो’ राष्ट्रांचं म्हणजे ब्रिटन-फ्रान्स-अमेरिका यांचं एक लढाऊ विमान पळवलं जातं. या विमानात दोन अणुबॉम्ब असतात. पण, हे विमान वेस्ट इंडिजमधल्या बहामा बेटांजवळ समुद्रात कोसळतं. मात्र, त्याच्यातले दोन अणुबॉम्ब स्पेक्टर या अतिभयानक संघटनेच्या प्रमुखाच्या हाती लागतात. तो ते आपल्या पाणबुडीवर लपवून ठेवतो आणि ‘नाटो’ राष्ट्रांकडे १० ० दशलक्ष डॉलर्सच्या खंडणीची मागणी करतो. तेव्हा इयान फ्लेमिंगचा नायक जेम्स बाँड यात उतरतो. बाँड आणि खलनायक यांच्या समुद्रतळच्या आणि समुद्राच्या पृष्ठभागावरच्या खेळ्या नि प्रतिखेळ्यांची जी वर्णन फ्लेमिंगने केली आहेत, ती थक्क करून टाकणारी आहेत.पाश्चिमात्य लेखक आपल्या साहित्यामधून ज्या अशा लोकविलक्षण प्रतिमा निर्माण करतात, त्या काल्पानिक नसतात. त्यांना प्रत्यक्षाचा सणसणीत आधार असतो. असाच एक प्रत्यक्ष चालता-बोलता कॅप्टन नेमो म्हणजे डॉ. जॉन क्रेव्हन. वर्षानुवर्षं डॉ.जॉन अमेरिकन नौदलाच्या समुद्रतळाच्या हेरगिरी प्रकल्पाचा प्रमुख होता. समुद्रतळाशी खोलवर बुडी मारून राहिलेल्या पाणबुडीतून क्षेपणास्त्र सोडता येईल का? डॉ. जॉन के्रव्हन आणि त्यांच्या वैज्ञानिक पथकाने हे सिद्धच करून दाखवलं. १९६० साली अमेरिकन नौदलाच्या ‘स्पेशल प्रोजेक्ट ऑफिस’ (एस.पी.ओ) या विभागाने समुद्रतळाशी खोलवर असलेल्या एका पाणबुडीतून ‘पोलारिस’ हे त्यावेळच अत्याधुनिक क्षेपणास्त्र यशस्वीरित्या प्रक्षेपित करून दाखवलं.
जग थक्क झालं नि भयभीतही झालं. या यशाचा अर्थ जगातलं समुद्रकिनार्यावरचं कोणतंही शहर आता अमेरिकन नौदलाच्या टप्प्यात आलं, असा होता आणि ‘एसपीओ’चा प्रमुख होता डॉ. जॉन के्रव्हन.मध्ययुगीन कालखंडात इस्लामी अरब आणि कॅथालिक स्पॅनिश यांच्यात जबरदस्त संघर्ष झालेला आहे. दोघेही पक्के दर्यावर्दी आणि सारखेच शूर. (नि क्रूर सुद्धा!) आशियाई, अरब आणि युरोपीय, स्पॅनिश स्त्रिया यांच्या संकरातून स्पेनमध्ये मुसलमानांची एक नवीनच जमात उत्पन्न झाली. तिला म्हणतात ‘मूर.’ स्पेनमध्ये ख्रिश्चनांनी मुसलमानांचा पुरा मोड केल्यावर या मूर अरबांना कुणी त्राता उरला नाही. मग त्यांनी भूमध्य समुद्रात चांचेगिरी करून भयंकर धुमाकूळ घातला.डॉ. जॉन क्रेव्हनच्या आईचं घराणं मूळचं या अरब-मूर चाच्यांपैकी होतं. त्याचा बाप मात्र पक्का प्रेस्बिटेरियन ख्रिश्चन होता. डॉ. जॉनची समुद्राची आवड कदाचित त्याच्या आईकडून आलेला आनुवांशिक वारसा असू शकेल. पण, तसा तो दर्यावर्दी मात्र नव्हता. दुसर्या महायुद्ध काळात अमेरिकन नौदलाच्या न्यू मेक्सिको नामक युद्धनौकेवर त्याने कामगिरी बजावली होती. पण, तसा तो जन्मजात खलाशी वृत्तीचा नव्हता. समुद्री संशोधन हे त्यांच आवडीचं क्षेत्र होतं. महायुद्ध संपल्यावर तो प्रथम ‘बीए’ झाला. मग ‘एमएससी’ झाला आणि पाठोपाठ ‘पीएच.डी’ही झाला. अमेरिकन नौदल यावेळी अणु-पाणबुडी बनवण्याचा विचार करीत होते. नौदलाने ताबडतोब डॉ. जॉनला या प्रकल्पासाठी उचललं. हे सगळंच संशोधन आणि कार्यान्वयन अर्थातच अत्यंत गुप्त स्वरूपाचे होते. अधिकृतरित्या फक्त अमेरिकन नौदल एवढीच संस्था अस्तित्वात होती आणि ती बिचारी आपल्या देशाच्या क्षेत्राच्या सुरक्षेचं नेमून दिलेले काम इमानेइतबारे करीत होती.
प्रत्यक्षात अर्थातच नौदल किंवा इतरही विभाग नाना प्रकारच्या सैनिकी व वैज्ञानिक उलाढालींमध्ये गुंतलेले होते. हे सगळं अर्थातच अपरिहार्य होतं. कारण,अमेरिकेचा प्रतिस्पर्धी असणारा सोव्हिएत रशिया अशाच सगळ्या उलाढाली करीत होता. त्याला सगळं जग आपल्या लाल साम्राज्यात आणायचं होतं. अमेरिकेला तसं घडू द्यायचं नव्हतं. म्हणजे अमेरिका ही मोठी धुतल्या तांदळासारखी होती असं नव्हे. पण, सोव्हिएत रशियाला जगावर प्रत्यक्ष राज्य करायचं होतं. अमेरिका पक्की व्यापारी होती नि आहे. जगाने बाकी काहीही झक मारावी, फक्त व्यापार आम्ही सांगू त्याच प्रकारे करावा, एवढाच (!) अमेरिकेचा आग्रह असतो.तर डॉ. जॉन क्रेव्हनच्या नेतृत्वाखाली अमेरिकन नौदलाच्या ‘स्पेशल प्रोजेक्ट ऑफिस’ या गुप्त विभागाने एका पाठोपाठ एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्याचा नि ते यशस्वी करण्याचा धडाका लावला. १९६० साली ’पोलारिस’क्षेपणास्त्राचं यशस्वी प्रक्षेपण झालं. १९६५ साली डॉ. जॉनने ‘हॅलिबट’ ही अणू पाणबुडी पूर्णपणे एका हेरगिरी करणार्या जहाजात परिवर्तीत केली. तिच्यावरचे नाना प्रकारचे कॅमेरे, समुद्रातल्या वेगवेगळ्या खोलीप्रमाणे कमीअधिक प्रखर होणारे शोधक दिवे समुद्राच्या तळातली सामग्री उचलू शकणारे यांत्रिक हात, ही सगळी यांत्रिक-तांत्रिक करामत कादंबरी किंवा चित्रपटापेक्षाही अद्भुत होती.
‘हॅलिबट’ला लगेचच साजेसे कामही मिळाले. १९६६ साली एक अमेरिकन ‘बी-५२ बॉम्बर’ विमान अटलांटिक महासागराच्या स्पेन-पोर्तुगाल देशांच्या किनार्यांजवळून जात असताना, विमानातला काहीतरी मुद्देमाल समुद्रात पडला. सामान्य माणूस अज्ञानी असतो नि अज्ञानातच आनंद असतो, असे म्हणतात. काही वेळा ते बरोबरच असतं. कारण, विमानातून काय पडलं हे नक्की माहीत नसल्यामुळे कोणालाच फारसं काही वाटलं नाही.पण, ज्यांना ते माहीत होतं, ते मात्र भयाने गर्भगळीतच व्हायची वेळ आली. कारण, या विमानातून अपघाताने समुद्रात पडलेला मुद्देमाल म्हणजे एक हायड्रोजन बॉम्ब होता. अणुबॉम्बपेक्षाही विध्वंसक असा महाभयंकर हायड्रोजन बाम्ॅब. पण, डॉ. जॉन क्रेव्हनच्या वैज्ञानिक पथकाने समुद्रतळातली सुई शोधावी, तसा तो हायड्रोजन बॉम्ब सुरक्षितपणे वर काढला. १९६८ साली अशीच अमेरिकेची ‘स्कॉर्पिअना नावाची पाणबुडीच एकाएकी गायब झाली. डॉ. जॉनच्या ‘एसपीओ’ विभागाने ती शोधून काढली. १९७१ साली ‘हॅलिबट’ हेर पाणबुडीने फारच मोठं घबाड मिळवलं. सोव्हिएत रशियाच्या ओखोटस्क समुद्रात उभ्या असलेल्या एका पाणबुडीचंं संपूर्ण संदेश वहन हॅलिबटने यशस्वीरित्या ‘टॅप’ केले. सोव्हिएत नौदलातली खूप मोठी माहिती यातून अमेरिकन नौदलाला मिळाली.
१९६८ साली आणखी एक विचित्र घटना घडली होती. ‘हॅलिबट’ने पॅसिफिक महासागराच्या तळातून ‘के-१२९’ ही बुडालेली सोव्हिएत पाणबुडी उचलून आणली. तिच्यात बरीच गुप्त माहिती मिळेल, असे अमेरिकन गुप्तहेर खात्याला वाटत होते. पण, प्रत्यक्षात फार काही हाती लागले नाही. वरकरणी अमेरिकेने असे जाहीर केले की, आम्ही मँगनीज धातूची मोठी खाण मिळेल म्हणून त्या ठिकाणी उत्खनन केले. पण,आमचा अंदाज चुकला. आम्ही उत्खनन बंद करीत आहोत.हे कळल्यामुळे उत्तेजित झालेल्या अन्य काही देशांनी तिथे उत्खनन करून मँगनीज काढण्याचा प्रयत्न केला. पण, ते तिथे नव्हतंच, तर कुठून मिळणार? मात्र, त्या देशांचा उगीचच होणारा खर्च पाहून डॉ. जॉन के्रव्हनमधला वैज्ञानिक अस्वस्थ झाला. पण, तो जाहीरपणे काही बोलूही शकत नव्हता.अलीकडे तो पॅसिफिक महासागरातल्या हवाई या अमेरिकेच्या मालकीच्या बेटांमध्ये राहिला होता. समुद्र तळातलं गारढोण पाणी आणि समुद्राच्या पृष्ठभागावरचं उबदार पाणी यांच्या विशिष्ट मिलाफातून मर्यादित प्रमाणात वीजनिर्मिती करण्याचं उद्दिष्ट त्याने साध्य केले होते. त्यामुळे उत्साहित होऊन एका शहराला पुरेल एवढी वीज त्याच्या जवळच्या समुद्रातून निर्माण करता येईल का, यावर त्याचं संशोधन चालू होते, असा हा वैज्ञानिक हेर, समुद्रतज्ज्ञ २० १५च्या दि. १२ फेबु्रवारी रोजी वयाच्या ९० व्या वर्षी मरण पावला. तो अखेरपर्यंत कार्यरत होता.
मल्हार कृष्ण गोखले