ठाणे : ठाणे शहराच्या तसेच शिवसेनेच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे सेना नेते सतीश प्रधान ( Satish Pradhan ) यांचे रविवार, दि. २९ डिसेंबर रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. ठाणे महापालिकेचे पहिले महापौर म्हणून त्यांनी ठाण्याच्या परिवर्तनाचा पाया रचला. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या स्थापनेपासूनच ते संघटनेत कार्यरत होते.
तलावांचे गाव असलेले ‘ठाणे’ शिवसेना नेते सतीश प्रधान यांच्या काळात शहरात रूपांतरित झाले. प्रशासकीय कार्यक्षमता दाखवत क्रीडा, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देत त्यांनी पायाभूत सुविधा उभारल्या. कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी. यासाठी त्यांनी उभारलेले ज्ञानसाधना महाविद्यालय आज हजारो कष्टकरी, दलित, आणि उपेक्षित वर्गाच्या ज्ञानार्जनासाठी आधार ठरले. शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे.
ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि राम गणेश गडकरी रंगायतन ही त्यांच्या दूरदृष्टीची ठळक उदाहरणे आहेत. सोमवार, दि. ३० डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते ११ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेजमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर ११ नंतर जवाहर बाग वैकुंठ भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ठाण्याचे ‘प्रधान’ गेले!
सतीश प्रधान आणि ठाणे शहर यांचे अतूट नाते होते. सतीश प्रधान हे नाव ठाणे आणि ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासात मोठे योगदान दिले. विशेष म्हणजे शहराच्या विकासाला योग्य दिशा दिली. त्याचेच फलित म्हणजे आजचे ठाणे होय. राम गणेश गडकरी रंगायतन असो, दादोजी कोंडदेव स्टेडियम असो, या वास्तू सतीश प्रधान यांची या शहराला देणगीच आहे. याशिवाय विविध योजना, उपक्रम, कला, क्रीडा, शिक्षण आदी क्षेत्रातील त्यांचे योगदान शहरासाठी आजही आदर्शवत आहेत. त्यांनी सुरू केलेली मॅरेथॉन म्हणजे एक माईल स्टोनच म्हणावा लागेल. माझे आणि त्यांचे वैयक्तिक संबंध अत्यंत मधुर होते. त्यांचे अनेक उपक्रम, योजना, प्रकल्प हे राजकारणापलीकडचे होते. त्यामुळे मी अशा उपक्रमात सहभागी असायचो. ठाण्यातील शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे निधन हे ठाणेकरांना चटका लावून जाणारे आहे. मी तसेच, माझ्या कुटुंबातर्फे आणि भाजपतर्फे श्रद्धांजली वाहतो.
संजय केळकर, आमदार, ठाणे शहर
ठाण्याच्या विकासात सतीश प्रधानांचे मोठे योगदान
ठाणे महापालिकेचे पहिले महापौर, शिवसेना नेते, माजी राज्यसभा खासदार आणि ज्ञानसाधना कॉलेजचे संस्थापक स्वर्गीय सतीश प्रधान यांच्या वृद्धापकाळाने निधन झाल्याची दु:खद बातमी समजली. ठाणे शहराच्या विकासात त्यांनी केलेले मोठे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांनी ठाणे शहराला पहिले स्टेडियम, नाट्यगृह आणि सर्वसामान्य मुलांच्या शिक्षणासाठी ज्ञानसाधना महाविद्यालयाची स्थापना केली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्षे राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो, आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.