मुंबई, दि.२७ : प्रतिनिधी बोरिवली विभागात रस्ते विभागामार्फत सुरु असलेली रस्ते विकासाची कामे प्राधान्याने व जलद गतीने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. तसेच, पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत बोरिवली रेल्वे स्थानक परिसरातील प्रस्तावित कामाचा पहिला टप्पा पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावा, असे स्पष्ट निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. विकास कामांची गुणवत्ता राखण्यावर अधिक भर द्यावा, अधिकारी - अभियंत्यांनी कार्यस्थळास प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करावी, असे निर्देश देखील गगराणी यांनी दिले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी गुरुवार, दि.२६ रोजी बोरिवली येथील आर मध्य विभाग अंतर्गत सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या विविध विकास कामांची स्थळ पाहणी केली. त्यानंतर, आर मध्य विभाग कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. उप आयुक्त (परिमंडळ ७) डॉ. भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त (आर मध्य विभाग) संध्या नांदेडकर यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
विकास कामांची पाहणी
बोरिवली (पूर्व) भागात पश्चिम रेल्वे परिसरामध्ये पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याच्या तक्रारीची दखल घेत महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी या परिसरास भेट दिली. पावसाळी पाण्याचा निचरा करण्याकरीता पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत प्रस्तावित कामांची माहिती घेतली. यावेळी गगराणी यांनी आर मध्य विभागामार्फत पूर्ण करण्यात आलेल्या गोराई जेट्टी मार्ग, पंगत हॉटेल समोर महात्मा फुले झोपडपट्टी निष्कासनानंतर करण्यात आलेले रस्ता रुंदीकरण आणि उद्यान विकसित कामांची पाहणी केली. बोरिवली पश्चिम येथे सुरू असलेल्या भारतरत्न डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम उद्यानाच्या सुधारणा कामाचे गगराणी यांनी कौतुक केले. उद्यानातील अॅथलॅटिक ट्रॅक, सुशोभीकरण कामे इतरांसाठी अनुकरणीय असल्याचे त्यांनी नमूद केले. लालजी त्रिकमजी मुंबई पब्लिक स्कूल या शाळेला भेट देत गगराणी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.तत्पूर्वी त्यांनी नागरी सुविधा केंद्राला भेट देत नागरिकांसमवेत संवाद साधला. तसेच, नागरी सुविधा केंद्राच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.