५ वर्षीय चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या पोलीसावर कठोर कारवाई करा!

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे : पोलीस अधिकाऱ्यांशी केली चर्चा

    27-Dec-2024
Total Views | 78
 
Neelam Gorhe
 
पुणे : विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी ५ वर्षीय चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या पोलीसावर कठोर कारवाई करा, अशा सूचना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत. शुक्रवार, २७ डिसेंबर रोजी त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने आणि पोलीस निरिक्षक धुमाळ यांच्यासोबत चर्चा केली.
 
विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला मद्यधुंद अवस्थेत चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या सचिन सस्ते नामक नराधम पोलिसाचे निलंबन करण्यात आले त्याच्यावर पॉक्सोसह ॲट्रॉसिटीनुसार (Atrocity) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
हे वाचलंत का? -  "मनमोहन सिंगांनी न बोलता जे करून दाखवलं ते..."; राज ठाकरेंनी पोस्ट करत जागवल्या आठवणी
 
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, "लोणावळा खंडाळा परिसर सुप्रसिद्ध पर्यटन क्षेत्र असल्यामुळे अनेक पर्यटकांची येथे रेलचेल असते. या पर्यटकांमध्ये अनेक महिला आणि मुलींचा समावेश असतो. त्यामुळे महिला आणि लहान मुलींच्या संरक्षणाकरिता महिला पोलिसांची आवश्यकता आहे. तसेच यथाशक्य बालसमुपदेशक सुद्धा आवश्यक आहे. लोणावळा खंडाळा परिसरामध्ये स्थानिक पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे सुट्टीच्या दिवशी इतर क्षेत्रातील पोलिसांची अतिरिक्त कुमक गस्तीसाठी मागवावी लागते. त्यामुळे बाहेरील पोलिसांची मदत घेते वेळेस त्यांची सेवा पडताळणी करणे आवश्यक वाटते," असे त्यांनी सांगितले. यासोबतच पीडित मुलीच्या पालकांना स्त्री आधार केंद्र, पुणे या संस्थेच्यावतीने त्यांनी २५ हजार रुपयांची मदत दिली.
 
आरोपी पोलिसाला २५ डिसेंबर रोजी एक दिवसाकरिता बंदोबस्तासाठी पाठवलं होतं. त्याला विसापूरच्या पायथ्याखाली बंदोबस्त दिला होता. यावेळी जेवताना त्याने मद्य प्राशन केले. त्यानंतर लघवीला जातो म्हणून तो तिथून खाली गेला. तिथे चिमुकली खेळत असताना तिला चॉकलेटचे आमिष दाखवले आणि संधीचा फायदा घेत त्याने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. घडलेला सर्व गैरप्रकार मुलीने आपल्या आईला सांगितला. या घटनेची तक्रार आल्यानंतर आम्ही तिथे गेलो. त्या पोलिसाला ताब्यात घेतलं. त्याची मेडिकल तपासणी झाली. फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121