कुवेत सिटी (PM Modi in Kuwait): भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचे अमीर अल-अहमद अल- जाबेर अल साबह यांच्याकडून 'द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भारत आणि कुवेत यांच्यातील संबंध दृढ केल्याबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. कुवेतच्या बयान पॅलेस मध्ये २२ डिसेंबर रोजी हा सन्मान सोहळा पार पडला.
द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट हा किताब राजघराण्यातील व्यक्ती, राज्यप्रमुख, राजदूत यांना प्रदान केला जातो. मोदी यांच्यापूर्वी अमेरीकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि जॉर्ज बुश यांना प्रदान करण्यात आला होता. भारताचे राजनैतिक संबंध दृढ व्हावे यासाठी दोन दिवसीय कुवेत दौऱ्यावर असताना, मोदींना हा सन्मान प्रदान करण्यात आला. आपल्या भावना व्यक्त करताना मोदी म्हणाले की हा बहुमान भारतातल्या लोकांचा आहे. तसेच भारत आणि कुवेत यांच्यातील मैत्री टिकवणाऱ्यांचा हा सन्मान आहे. परराष्ट्रमंत्रालयाचे सचिव रणधीर जयस्वाल यांनी म्हटले की मोदींना मिळालेला हा सन्मान म्हणजे भारत आणि कुवेत यांच्यातील मैत्रीचा पुरावाच आहे. जागतिक स्तरावर मोदींना मिळालेला हा २०वा सन्मान आहे. जागतिक पातळीवर भारताच्या वाढत्या महत्वाचे प्रतिक आहे. सौदी अरेबिया, युएई, बहरीन या आखाती राष्ट्रांनी या पूर्वीच मोदींचा गैारव केला आहे. या व्यतिरिक्त नोव्हेंबर महिन्यात गयाना आणि डोमेनिका या देशांनी मोदी यांचा सन्मान केला. भारताच्या वाढत्या प्रभाव क्षेत्राचेच हे प्रतिक असल्याचे बोलले जात आहे.