मुंबई : उद्धव ठाकरे यांचे हिंदूंच्या, हिंदुत्वाविषयीचे प्रेम बेगडी आहे. ज्यावेळी साधू हत्याकांड झाले त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी काय भुमिका निभावली ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेय, अशा परखड शब्दांत भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना आमदार दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांनी मंदिर, हिंदुत्वाबाबत केलेल्या विधानाला चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, बांगलादेशात असणाऱ्या हिंदूंच्या मागे भाजपा पूर्णपणे ताकदीनीशी उभी आहे. त्यांच्यासोबत आमच्या संवेदना आहेत. केंद्र सरकारही त्यांच्या रक्षणासाठी कटीबद्ध आहे. केंद्राने याबाबत नागरिकत्व दुरुस्तीचा कायदा आणला आहे. त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या पक्षाने बोटचेपी भुमिका घेतली. हिंदूंविषयी किंवा हिंदुत्वाविषयी बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही.
तसेच ज्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार सोडला आणि सत्तेच्या लाचारीसाठी ज्यांनी आयुष्यभर हिंदुत्वावर टीका केली, सावरकर यांच्याविषयी गरळ ओकली त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या उद्धव ठाकरेंना बोलण्याचा अधिकारच उरत नाही. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांनी सातत्याने सावरकरांचा अपमान करणारी विधाने केली आहेत. सावरकरांची प्रतिमाच काढा असे जेव्हा काँग्रेसने सांगितले तेव्हा उद्धव ठाकरेंच्या तोंडाला कुलूप लावले गेले होते का? असा सवालही दरेकरांनी उपस्थित केला.
दरेकर पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे पराभवाने खचले आहेत. कटेंगे तो बटेंगे, हम सब एक है तो सेफ है या नाऱ्यांनी जो प्रतिसाद दिला आणि उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीची जी धुळधाण उडालीय त्यातून ते हतबल झालेत. त्यातून अशा प्रकारच्या नवीन क्लुप्त्या काढून वातावरण निर्माण करण्याचा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न उद्धव ठाकरेंचा सुरू आहे. हनुमान मंदिराच्या बाबतीत आता जागे झालेत. रेल्वे प्रशासनाने जी काही नोटीस पाठवली आहे ती आम्ही बघून घेऊ. परंतु राम मंदिराच्या निर्माणावेळी कुतसितपणाने टोमणे मारणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता मंदिरांची आठवण आली. नक्कीच आमच्या देवदैवतांनी, हिंदुत्वाने त्यांना जमिनीवर आणलेय. त्यामुळेच त्यांना आता ही भुमिका नाईलाजाने का होईना घ्यावी लागतेय, असा टोलाही दरेकरांनी लगावली.
दरेकर पुढे म्हणाले की, पाच वेळा मंदिराला नोटीस पाठवली त्यावेळी आमचे सरकार नव्हते. आता नोटीस गेलीय म्हणजे लगेचच मंदिर तोडले असे होत नाही. केंद्र आणि राज्य सरकार लक्ष घालेल आणि निश्चितच मंदिराचे रक्षण करणे किंवा त्यांची पुनःस्थापना योग्य पद्धतीने करणे ही आमची जबाबदारी असून त्यापासून कसुभरही मागे हटणार नसल्याचे दरेकरांनी सांगितले.
राज्याला स्थिर सरकार मिळेल, विरोधकांनी चिंता करू नये
आमदार दरेकर पुढे म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराची कल्पना नाही. याबाबत अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. दोन उपमुख्यमंत्री आणि त्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून तथापी फडणवीसांनी सुतोवाच केले होते की, नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. १६ तारखेला अधिवेशन आहे त्याआधीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. विरोधकांनी चिंता करायचे कारण नाही. महाराष्ट्रात तीन पक्षाचे, महायुतीचे सरकार आहे ज्यावेळी अशा प्रकारचे सरकार असते त्यावेळी एकमेकांच्या जागा, खातेवाटप निश्चित करणे हे नीट व्हावे लागते. येणाऱ्या काही दिवसात ते होईल आणि महाराष्ट्राला स्थिर, भक्कम सरकार मिळेल.
नानांच्या वक्तव्याचा, कृतीचा आम्हाला फायदा
पटोलेंच्या पदमुक्त करण्याच्या मागणीवर आमदार दरेकर म्हणाले की, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. नाना पटोले यांना पदमुक्त करायचे की काँग्रेसला सावरण्याचा प्रयत्न करायचा की काँग्रेसला आणखी अधोगतीला जाऊ द्यायचे, हा त्यांच्या पक्षातील विषय आहे. नाना पटोले यांनाच परत प्रदेशाध्यक्ष ठेवा, म्हणजे आमचे काम आणखी सोपं जाईल. पटोलेंच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि त्यांच्या कृतीतून आम्हालाच मदत होत असते, असा टोलाही दरेकरांनी लगावला.