पंडितकवी मुक्तेश्वर यांचे ‘संक्षेप रामायण’

    09-Nov-2024
Total Views | 43

Panditakvi Mukteshwar
आपल्या महाराष्ट्राचे भाग्य एवढे थोर की, आपणास ‘संत, पंत आणि तंत’ असे तीन प्रकारचे कवी लाभलेले. संतकवी, पंडितकवी आणि शाहीर कवी अशा तीन परंपरांपैकी पंडितकवींच्या परंपरेतील कवी मुक्तेश्वर हा सर्वात लोकप्रिय प्रतिभासंपन्न व कलाचतुर असा कवी होता. तो संत एकनाथांचा नातू होता. त्यांचे मराठी व संस्कृत भाषांतर प्रचंड प्रभुत्व होते. तो मराठी भाषाभिमानी म्हणून प्रसिद्ध होता. मुक्तेश्वरांचा एक भारत काव्य पर्वाचा ‘मराठी साहित्यातील कोहिनूर’ गौरव केला जातो. इतिहासाचार्य राजवाडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर सह अनेक थोर मोठ्यांनी मुक्तेश्वर काव्याचा गौरव केलेला आहे. अशा मुक्तेश्वरांचे ‘संक्षेप रामायण’ लिहिले आहे. संत एकनाथांच्या भावार्थ रामायणाचे हे संक्षिप्त रूप, आटोपशीर आवृत्ती आहे.
महाराष्ट्राला संतकवी, पंतकवी आणि तंतकवी अशी कवींची प्रदीर्घ परंपरा असून महाराष्ट्राची काव्यधारा या तीन कवींनी संपन्न झालेली आहे. संतकवी, पंडितकवी आणि शाहीर यांची फार मोठी मांदियाळी महाराष्ट्राला लाभलेली आहे. संतकवींमध्ये संत निवृत्तीनाथ-ज्ञानदेव ते संत तुकडोजी महाराज अशी वैभवशाली परंपरा आहे. तर, शाहिरी संतकाव्यात रामजोशी, सगनभाऊ, पठ्ठे बापूराव असे कवी आपणास लाभलेले आहेत आणि पंडितकवींमध्ये वामन पंडित, मोरोपंत यांच्या नाममालेतील आणखी एक सशक्त-समर्थ पंडितकवी म्हणजे ‘मुक्तेश्वर.
पंडित कवी मुक्तेश्वर हे संत एकनाथ महाराज यांच्या ज्येष्ठ कन्या गोदावरीचे सुपुत्र, संत एकनाथांचे नातू आहेत. संतकवी संत एकनाथांच्या संस्काराने बहरलेले मुक्तेश्वर हे पंडित त्यांचे नेमके जन्मवर्ष, कर्मभूमी आणि खरे नाव याविषयी बरेच मतभेद आहेत. काही संशोधकांच्या मते, मुक्तेश्वरांचा जन्म व कर्मभूमी पैठण हीच होती व त्यांना संत एकनाथांचा १२-१५ वर्षे सहवास लाभला होता. काही संशोधकांच्या मते, मुक्तेश्वरांचा जन्म-कर्मभूमी आणि समाधी स्थान हे कृष्णानदी काठच्या नरसोबाच्या वाडी जवळील ‘तेरवाड’ हे आहे. तेरवाड येथे मुक्तेश्वरांची समाधी आहे. यावर मात्र कोणताही विवाद नाही. तसेच त्यांच्या पित्याचे नाव चिंतामणी होते, हेही सर्वमान्य आहे. पण, ‘मुक्तेश्वर’ हे त्यांचे मूळनाव आहे की ते कवी, लेखक, म्हणून स्वीकारलेली साहित्य नाममुद्रा आहे. यावर संशोधकांचे दुमत आहे. काहींच्या मते, मुक्तेश्वरांचा जन्म काळ सुमारे इ. स. १५७४ सालच्या दरम्यान असावा, तर महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल. भावे, ओक यांच्या मते मुक्तेश्वराचा जन्म इ. स. १६०९ सालचा आहे. प्रा. प्रियोळकर यांनी मुक्तेश्वरांच्या महाभारत पर्वाचे चार खंडात संपादन केलेले आहे. नव्या संशोधनानुसार मुक्तेश्वर काव्यातील ‘लीला विश्वंभर’हा उल्लेख त्याच्या मातापित्याच नसून उपास्य देवतेचा आहे. मुक्तेश्वर दत्त संप्रदायी होता. भगवान दत्तात्रयाचा उल्लेख मुक्तेश्वराने ‘लीला विश्वंभर’ म्हणून केलेला आहे. ‘मुक्तेश्वर’ हे नाव ही दत्तदेवतेचेच एक नाम आहे. ते त्याचे कविनाम असून त्याचे खरे नाव मुदगल आहे. मुदगल हे आडनाव नाही. त्यांच्या काव्याचे एकनाथी वळण आणि महाराष्ट्रातील तत्कालीन समाजस्थिती पाहता मुक्तेश्वर हे शिवपूर्व काळातील होते असे म्हणावे लागते.
संक्षेप रामायणाची वैशिष्ट्ये
पंडित कवी मुक्तेश्वरांना आपल्या आजोबांचा, संत एकनाथांचा व त्यांच्या ओजस्वी वाङ्मयाचा सार्थ अभिमान होता. नाथांच्या सर्व वाङ्मयाचा त्यांचा अभ्यास होता. नाथांचे ‘भावार्थ रामायण’ त्यांना विशेषत्वाने आवडत होते. परंतु, भावार्थ रामायणाचा ४० हजार ओव्यांचा अवाढव्य विस्तार, त्यांना संस्कृत पंचमहाकाव्याच्या पार्श्वभूमीवर खूपच अधिक वाटत होता. त्यामुळे त्यांनी आजोबांच्या भावार्थ रामायणाचा आपल्या संस्कृत व मराठी भाषा प्रभुत्वाच्या अधिकाराने केवळ १ हजार, ७२२ ओव्यांत, अगदी आटोपशीर संक्षेप केला. म्हणून या ग्रंथास मुक्तेश्वर कृत ‘संक्षेप रामायण’ किंवा मोठ्या साक्षेपाने त्याने हा संक्षेप केला. म्हणून त्यास ‘साक्षेप रामायण’ अशाही नावाने ओळखले जाऊ लागले. मराठी साहित्यातील थोर व्यासंगी, संशोधक, ल. रा. पांगारकर, श्री. भिडे आणि डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी पंडित कवी मुक्तेश्वरांच्या वाङ्मयाचा गौरवपूर्ण आढावा घेतलेला आहे. संस्कृत पंचमहाकाव्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून मुक्तेश्वरांनी साक्षेप रामायणाचे लेखन केले, असे त्यातील कांडात्मकता व सर्गयुक्तता, निसर्गवर्णने, वृत्तयोजना, अलंकाराची रेलचेल, पदलालित्य यावरून स्पष्ट जाणवते. तसेच यमक, अनुप्रास, श्लेष या शब्दालंकाराचा चपखळ उपयोग यावर मुक्तेश्वराचा भर असून शब्दवैभव व भाष्यप्रभूत्व याचे ते दर्शन आहे.
रघुपती तुझे प्रेमे क्षेम देता विनोदे
जवं की निकरि वैरी हार फेडी विषादे ।
गिरि, सरि, तरू, आता मंडले आड ठेली
म्हणवुनि बहुशोके जानकी साद घाली॥
मुक्तेश्वरांनी लिहिलेले ‘संक्षेप रामायण’ ही त्यांची पहिली साहित्य रचना आहे. मुक्तेश्वरांची खरी ओळख, लोकप्रियता ही त्यांच्या ‘महाभारत पर्वा’ मुळे आहे. त्यांची भारत पर्वे आख्यानकाव्याचा आदर्श व सर्वांग सुंदर वस्तुपाठ आहे. विशेष ‘आदिपर्व’ मराठी रसिकाच्या सर्वाधिक पसंतीचे लोकप्रिय काव्य आहे. पण, ती उंची-दर्जा मुक्तेश्वरांच्या संक्षेप रामायणाचा नाही, असे समीक्षकांचे मत आहे. संक्षेप रामायणात शृंगार रसाचा अपेक्षेपेक्षा अधिक मुक्त वापर झालेला आहे. शृंगाराच्या अतिरेकी वर्णनामुळेच कदाचित मुक्तेश्वराच्या ‘संक्षेप रामायण’कडे श्रद्धावंत भाविक वाचकांनी पाठ फिरवली असावी. अशीच गोष्ट प्रा. आनंद साधले यांच्या ‘महाराष्ट्र रामायण’ बाबतीत घडलेली आहे. अतिरेकी शृंगाराचा आरोप तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी महाराष्ट्र रामायणावर केला होता व त्याकडेही मराठी वाचकांनी पाठ फिरवली. दुसरी गोष्ट म्हणजे, संक्षेप रामायणामध्ये मुक्तेश्वरांना संस्कृत पंचमहाकाव्यातील व अन्य संस्कृत साहित्यातील श्लोक, सुभाषिते, दृष्टांत यांचे भाषांतर केलेले आहे. या उसनवारीमुळे संक्षेप रामायणात मुक्तेश्वरांची स्वतःची बलस्थाने दुय्यम झाली आहेत. संस्कृतमधील जयदेवांचे ‘प्रसन्नराघव’, कालिदासाचा ‘रघुवंश’, जगन्नाथाचे ‘भामिनीविलास’ आणि भर्तृहरीची शतके यातील अनेक सुंदर सुंदर श्लोक-सुभाषिते मुक्तेश्वरांनी अनुवाद करून रामायणात घातले आहेत. पण, या आरोपाबरोबरच काहींच्या मते त्यामुळे मराठी भाषा संपन्न करण्याचा मुक्तेश्वरांचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
शिवधनु जड कैसे कूर्म काठिण्य पृष्ठी।
मदनजनक हा हो। लोकलावण्य सृष्टी।
तवकृत पण तातां। सिंधु कैसेनि लंघी।
रघुवर विजयी हो चंडकोदंड भंगी॥91॥
विद्याधर ताठे
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121