नाशिक : ( Satyapaal Singh ) “देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर देशातल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षा देण्याचे काम केले. पंतप्रधान मोदी यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात ८० टक्के नक्षलवादी कारवाया कमी झाल्या आहेत. या काळात फक्त कर्नाटकमध्ये दोनदा आणि पंजाब राज्यात एकदा अनुचित घटना घडली आहे. देश प्रगतिपथाकडे जात असताना महाराष्ट्रात मात्र तुष्टीकरणाचे राजकारण करण्याचे काम महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सुरु आहे,” असा घणाघात माजी केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये आलेले सत्यपाल सिंह यांची गुरुवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता भाजप उत्तर महाराष्ट्र मीडिया सेंटर, गुरूदक्षिणा हॉलच्या शेजारी, बीवायके कॉलेजजवळ, नाशिक येथे पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना सत्यपाल सिंह म्हणाले की, “काँग्रेस सरकारच्या सत्ताकाळात प्रत्येक आठवड्यात जातीय दंगल होत होती. जनतेला जातीजातींमध्ये लढवण्याचे काम सुरु होते. मात्र, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर नक्षलवादी आणि दहशतवादी कारवाया पूर्णपणे बंद करण्याचे काम केले. पण, राज्यात काही देशविघातक शक्तींकडून कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचे काम सुरु आहे. जातीजातींमध्ये वाद लावण्याचे काम केले जात आहे. या प्रकाराला महायुती सत्तेत आल्यानंतर आळा घालण्याचे काम केले. दोन वर्षांत महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था सुधारली आहे. राज्यात १३८ जलदगती न्यायालय सुरू करण्यात आले आहेत.” गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी ७० हजार सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याचे सिंह यांनी सांगितले. महाराष्ट्र प्रगतिपथावर असून परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आल्याचेही त्यांनी सांगितले.
देशातील ८० कोटी लोकांना अन्नसुरक्षा
“देशात अमृत काळ सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे २०४७ पर्यंत आपला देश ‘आत्मनिर्भर’ होणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन काम केले पाहिजे. देशातील गरिबांचा विचार करताना मोदी यांनी चार कोटी ५० लाख लोकांना पक्की घरे दिली आहेत.” भाजपच्या सत्ता काळात एकही गरीब भुकेने दगावला नसल्याचेही सत्यपाल सिंह यांनी सांगितले. देशातल्या ८० कोटी लोकांना अन्नसुरक्षा देण्याचे काम केले. प्रत्येक गरीब व्यक्तीला मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचे काम करण्यात आले आहे. मागील दहा वर्षांत भारत सरकारने केलेल्या विकासामुळे भारताच्या नागरिकांना विदेशात सन्मान मिळत आहे. आपल्याला आणि आपल्या मुलांना सुरक्षित ठेवायचे असेल तर महायुतीला पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने निवडून देण्याचे आवाहनही सत्यपाल सिंह यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केले.