धर्माच्या आधारावर कोणालाही आरक्षण देणार नाही! अमित शहा यांची स्पष्टोक्ती
ईशान्य आणि उत्तर मुंबईत सभांचा धडाका
13-Nov-2024
Total Views | 36
मुंबई : ( Amit Shah )धर्माच्या आधारावर कोणालाही आरक्षण देणार नाही, असे स्पष्ट करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वक्फ बोर्डाच्या विधेयकात सुधारणा करणार असल्याचा पुनरुच्चार मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी केला. केवळ 'व्होट बँके'च्या राजकारणासाठी काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे या विधेयकाला विरोध करीत असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी ईशान्य आणि उत्तर मुंबईत सभांचा धडाका लावला. घाटकोपर येथील सभेला संबोधित करताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशातील दहशतवाद संपवला, नक्षलवाद्यांचा बंदोबस्त केला. काँग्रेसच्या काळात मात्र पाकिस्तानातून दहशतवादी थेट भारतात येत होते आणि हल्ले करून पुन्हा पाकिस्तनात जायचे. या घटना वारंवार घडत होत्या. काँग्रेस सरकार त्यावेळी काही करू शकत नव्हते. अशा स्थितीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित राहू शकतो का? असा प्रश्न अमित शाह यांनी उपस्थित केला. याउलट मोदींनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला, असेही ते म्हणाले.
देशात मोदींच सरकार नसते, तर हे मुंबई शहर पाहण्यासारखे राहिले नसते. मुंबईत अनेक विकास कामे पूर्णत्वास गेली आहेत. अटल सेतू, कोस्टल रोड, भुयारी मेट्रो, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असे अनेक प्रकल्प त्यात सांगता येतील. महायुतीचे सरकार पुन्हा आल्यास याच वेगाने मुंबईचा विकास केला जाईल. भारतीय अर्थव्यवस्था लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था हेणार असल्याचे शाह यांनी सांगितले.
राज्यात महायुतीचेच सरकार येणार
विधानसभा निवडणुकीदरम्यान मी संपूर्ण महाराष्ट्र फिरलो आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल काय लागेल, हे आधीच सांगतो. राज्यात महायुतीचे सरकार येणार हे निश्चित आहे. महाविकास आघाडीचा सुफडा साफ होणार आहे. महायुतीने जो जाहीरनामा दिला, त्यातील वचने पूर्ण केली जातील, ही मोदींची गॅरेंटी आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर त्यांच्या अध्यक्षांनाच विश्वास नाही, असा टोलाही अमित शाह यांनी लगावला.
कलम ३७० पुन्हा नाहीच
राहुल गांधी यांची चौथी पिढी जरी आली, तरी कलम ३७० पुन्हा काश्मीरमध्ये लागू केले जाणार नाही. याबाबत उद्धव ठाकरे यांची भूमिका काय आहे, हे त्यांनी जाहीर करावे. महाविकास आघाडीकडून केवळ तुष्टीकरणाचे राजकारण सुरू आहे. असे नेते महाराष्ट्राचा, मुंबईचा विकास करू शकत नाहीत. ते केवळ जनतेची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे सुरक्षित आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी मोदींचे हात बळकट करा, असे आवाहन अमित शाह यांनी केले.