"उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय, उरलेत फक्त खान", राज ठाकरेंची खोचक टीका
12-Nov-2024
Total Views |
मुंबई : ( Raj Thackeray ) दिंडोशी विधानसभा मतदारसंघामध्ये दि. ११ नोव्हेंबर रोजी उमेदवार भास्कर परब यांच्या प्रचारार्थ मनसे प्रमुख राज ठाकरे यांची प्रचारसभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना निवडणूक चिन्हासकट शिंदेंकडे गेली. आज उद्धव ठाकरेंचा बाण निघून गेलाय आणि फक्त खान उरले आहेत", अशा शब्दात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे. तसेच वर्सोव्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार हारून खान यांच्या उमेदवारीवरही त्यांनी टीका केली आहे.
"उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय, उरलेत फक्त खान"
"गेल्या पाच वर्षातील सगळा गोंधळ तुम्ही पाहिलेला आहे. काय गोष्टी झाल्या? काय गोष्टी घडल्या? कोण कुठे गेलं? कोण कुणाबरोबर गेलं? कुठंपर्यंत गेलं प्रकरण? हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, ती आज गेली एकनाथ शिंदेंकडे तेही निवडणूक चिन्हासकट. मला अजूनही आठवतंय मराठवाड्यामध्ये एक स्लोगन चालायचं की, 'बाण हवा का खान?' दुर्दैव असं की आज उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय, उरलेत फक्त खान", अशा शब्दात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना खोचक टीका केली.
"ज्याच्या नावातच हारून आहे, तो विजयी कसा होईल?"
"वर्सोव्यामध्ये त्यांनी उमेदवार कोण दिलाय, हारून खान. शिवसेनेचा उमेदवार हारून खान, ज्याच्या नावातच हारून आहे, तो विजयी कसा होईल? इथपर्यंत तुमची वेळ गेली. म्हणजे कडवट हिंदुत्ववादीपासून ते मुसलमानांसमोर लाचार होणाऱ्यांपर्यंत, इथपर्यंत तुमची मजल गेली. हे उबाठा शिवसेनेचे उमेदवार त्यांचं पत्रक काढताहेत उर्दूमध्ये, कुठपर्यंत मजल गेली यांची बघा, काय पातळीला आले ते बघा", अशी टीका राज ठाकरेंनी उबाठाला खडेबोल सुनावले.