ठाण्यात ‘मविआ’मधील बंडाला काँग्रेस अध्यक्षांचीच फूस
व्हायरल संभाषणाने विक्रांत चव्हाण यांची पोलखोल
12-Nov-2024
Total Views | 32
ठाणे : महाविकास आघाडीतील ( MVA ) तिन्ही पक्षांमध्ये कुणाचा पायपोस कुणाला नाही, अशी स्थिती असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात झालेल्या बंडखोरीला काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचीच फूस असल्याचे उघड झाले आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मनोज शिंदे यांना काँग्रेस अध्यक्षांनीच फोनवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हायरल संभाषणाने काँग्रेसची चांगलीच पोलखोल झाली आहे.
ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघ असताना महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाण्यात काँग्रेसच्या वाटयाला भिवंडी आणि मिरा-भाईंदर या अवघ्या दोन जागा आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस पदाधिकार्यामध्ये नाराजी उमटून ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात ‘मविआ’मध्ये बंडाळी माजली आहे.
कोपरी-पाचपाखाडीतून महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणूक लढवत असून त्यांच्याविरोधात ‘मविआ’मधून उबाठा गटाचे केदार दिघे रिंगणात आहेत. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ प्रदेश पदाधिकारी मनोज शिंदे आणि काँग्रेसचेच सुरेश पाटील खेडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बेबनाव निर्माण झाला असल्याने शनिवारी दि. ९ नोव्हेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष चव्हाण यांनी दोन्ही बंडखोरांचे काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबन केल्याचे जाहीर केले.
शहर अध्यक्षाला काँग्रेस बंडखोरांचे आव्हान
कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदार संघात बंडाळी करणार्या मनोज शिंदे आणि सुरेश पाटील खेडे या दोन्ही बंडखोरांचे काँग्रेसने निलंबन करताना मनोज शिंदे यांनी बंड करण्यासाठी दोन कोटी घेतल्याचा जाहीर आरोप काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना मनोज शिंदे यांनी, विक्रांत चव्हाण यांनीच अर्ज भरण्यास तसेच आघाडीचा प्रचार करू नये, असे सांगितल्याचे छापील व ऑडिओ पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले. त्याचबरोबर ४२ तासात दोन कोटी घेतल्याचे पुरावे द्यावेत. अन्यथा, सूरज परमार खटल्यातील या आरोपीला मानहानीची नोटीस बजावून थेट तुरुंगात पाठवण्याचा मनसुबा बोलून दाखवला.