नवी दिल्ली : (West asia) पश्चिम आशियातील संघर्षही संवाद आणि मुत्सद्देगिरीनेच सोडविणे आवश्यक आहे, अशी अधिकृत भूमिका भारताने बुधवार, दि. २ ऑक्टोबर रोजी मांडली आहे. इराणने इस्रायलवर केलेला क्षेपणास्त्र हल्ला आणि त्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिलेली धमकी यामुळे पश्चिम आशियामध्ये युद्ध सुरू झाले आहे. त्याचवेळी, भारतानेही प्रथमच सद्य स्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम आशियातील परिस्थितीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने संवाद आणि मुत्सद्देगिरीने प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले. “आम्ही पश्चिम आशियातील बिघडत चाललेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे चिंतित आहोत आणि सर्व संबंधितांनी संयम बाळगावा आणि नागरिकांचे रक्षण करावे, यासाठी आम्ही आमच्या आवाहनाचा पुनरुच्चार करतो,” असे त्यात म्हटले आहे. “या संघर्षाने व्यापक प्रादेशिक परिमाण घेऊ नये आणि आम्ही आग्रह करतो की सर्व समस्या संवाद आणि मुत्सद्देगिरीने सोडवाव्यात,” असेदेखील भारताने म्हटले आहे.