मुंबई : सध्या चित्रपट असो किंवा वेबसीरीज भयपट आणि हॉरर कॉमेडी कलाकृतींना प्रेक्षक विशेष पसंती देताना दिसत आहेत. अशातच आता 'पौर्णिमेचा फेरा’ ही वेबसीरीज प्रदर्शित झाली आहे. शुभम प्रोडक्शन फिल्म्स प्रस्तुत 'पौर्णिमेचा फेरा' ही हॉरर कॉमेडी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून शुभम प्रोडक्शन फिल्म्सच्या युट्युब चॅनेलवर ही वेबसिरीज झळकली आहे.
या सीरिजमध्ये तीन मित्र त्यांच्या मित्राच्या कोकणातील वडिलोपार्जित घरी भेट देतात. कोकणातला त्यांचा हा प्रवास, यादरम्यान घडलेली घटना, त्यात दडलेली रहस्ये यात पाहायला मिळणार आहेत. ही रहस्ये काय असतील? पौर्णिमेच्या चंद्राचा आणि या घटनांचा काय संबंध असेल, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले असतील तर या सगळ्याची उत्तरे ही वेबसिरीज पाहून मिळतील. या वेबसीरिजचे चित्रीकरण मुंबईमधील काही भागांत आणि कोकणातील गुहागर येथे झाले आहे.
शुभम प्रोडक्शन फिल्म्स प्रस्तुत 'पौर्णिमेचा फेरा' या वेबसिरीजची निर्मिती पायल गणेश कदम यांनी केली असून अजय सरतपे दिग्दर्शित या सीरिजमध्ये निखिल बने, मंदार मांडवकर, सिद्धेश नागवेकर, संजय वैद्य, प्राची केळुस्कर, संदीप रेडकर, दीपा माळकर, चंदनराज जामदाडे, स्नेहल आयरे, दर्शना पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शुभम विलास कदम यांची कथा असलेल्या या सीरिजचे संवाद, लेखन संदेश लोकेगावकर यांनी केले आहे.