मुंबई : तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात मुंबई महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसन घोटाळ्यात शरद पवारांचे बंधू प्रताप पवार आणि चोरडिया बिल्डर सहभागी असल्याचा आरोप करीत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शनिवार, दि. ६ जानेवारी रोजी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
याविषयी पत्रकारांना माहिती देताना सोमय्या म्हणाले, भांडूप येथील १ हजार ९०३ सदनिकांच्या बांधकामांचे कंत्राट चोरडिया बिल्डर आणि पुण्यातील न्यू वर्ल्ड लॅण्डमार्क एलएलपीला देण्यात आले. या विकासकांनी निओ स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंपनीसोबत संबंधित जागेवर बांधकामासाठी करार (डेव्हलपमेंट राईट) केला. ही कंपनी शरद पवार यांचे बंधू प्रताप पवार यांच्या मालकीची आहे.
विशेष म्हणजे या कंपनीने बांधलेल्या १ हजार ९०३ सदनिका ५८ लाख रुपये (प्रति सदनिका) या दराने महापालिका खरेदी करणार आहे. प्रत्यक्षात जमीन आणि बांधकामाचा खर्च केवळ १५ ते १७ लाख इतकाच आहे. याचा अर्थ एका सदनिकेच्या मागे ४० लाख रुपये नफा शरद पवार यांचे बंधू प्रताप पवार यांची कंपनी, तसेच चोरडिया बिल्डर आणि न्यू वर्ल्ड लॅण्डमार्क एलएलपीला होणार आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला. त्यामुळे त्यांच्याविरोधात भादंसं कलम ४०६, ४०९, ४२०, १२० ब, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.