आजि सोनियाचा दिनु...

    21-Jan-2024
Total Views | 114
 Ayodhya
 
अयोध्येचे वर्णनच मुळी जिथे युद्ध नाही ती नगरी, असे आहे. या नगरीसाठी हिंदू समाजाने केलेल्या संघर्षालाही या मंदिराच्या निर्माणामुळे पूर्णविराम मिळाला आहे. यानिमित्त ज्ञात-अज्ञात अशा सगळ्यांचे स्मरण करीत, आपण या मंगलमय क्षणाचे सहभागकर्ते होऊया!
 
आज रामलला अयोध्येच्या भव्य मंदिरात विराजमान होत आहेत. हिंदूंच्या इतिहासात ज्याला आपण ‘आधुनिक’ किंवा ‘स्वातंत्र्योत्तर काळ’ म्हणू शकतो, त्यातला हा महत्त्वाचा टप्पा आहे. शेकडो वर्षे चाललेला हा संघर्ष आज पूर्णत्वाला आला आहे. अटलजींची कविता आहे-
युवक हार जाते हैं लेकिन
यौवन कभी न हारा
एक निमिष की बात नहीं
चिर संघर्ष हमारा
 
हिंदूंच्या किती पिढ्यांनी हा संघर्ष पाहिला, अनुभवला आणि आज हा कृतकृत्यतेचा क्षण प्रत्यक्षात उतरताना पाहिला, याची मोजदाद नाही. महाराष्ट्राच्या भूमीतून उत्तरेकडे कूच करणार्‍या मराठ्यांच्या फौजांनी केलेल्या करारनाम्यात श्रीराम जन्मभूमीचा उल्लेख आहे. जन्मभूमीचा हा लढा तितकाच जुना आहे; किंबहुना त्यापूर्वीचा. पिढ्यान्पिढ्या हिंदू समाज या लढ्यात योगदान देत राहिला. यात रणांगणावर लढलेले अज्ञात हुतात्मे आहेत; तसेच कोठारी बंधूंसारखे ज्ञात हुतात्मेही आहेत. हिंदूंनी हा लढा केवळ धर्मांध मुस्लिमांविरोधात दिला असे नाही, तर विकृत धर्मनिरपेक्षांशीसुद्धा लढला. बाबर, औरंगजेब यांच्याकडे किमान एक नेमके धर्मवेडेपण तरी होते.
 
स्वातंत्र्यानंतर मात्र हा लढा एक-एक विकृत व्यवस्थेशीच होता. यात राजकारणी होते, सनदी अधिकारी होते आणि होय, न्यायाधीशही होते. सत्ताधारी राजकारण्यांना मुस्लिमांच्या लाडावलेल्या मतपेटींची रास सोडली, तर काहीच दिसत नव्हते. महाराष्ट्रातून दिल्लीत गेलेल्या आणि गृहमंत्रालयात बड्या पदावर विराजमान झालेल्या, एका बड्या नोकरशाहने कारसेवकांना कसे रोखता येईल, याचे अत्यंत अघोरी आणि अमानुष आराखडे आखून दिले होते. त्यांच्यावरचे राजकारणी थोडे शहाणे होते म्हणून त्यांनी यांचा सल्ला मानला नाही. सगळ्यांनीच आपले तारतम्य सोडले होते. खरे तर उपासनापद्धती हे घटनादत्त स्वातंत्र्य, मात्र हिंदूंच्या हक्काची पायमल्ली तर राजरोसपणे झाली.
 
स्वातंत्र्यपूर्व काळात या लढ्याने हिंदू समाजाची परीक्षा पाहिली, तशीच किंवा त्यापेक्षा क्रूर परीक्षा काळाने संघ परिवाराची पाहिली. तीन पिढ्या या मंदिरासाठी झिजल्या. झिजल्या म्हणजे अक्षरश: झिजल्या. दगडाला पाझर फोडण्यासाठी प्रयत्न करावे, तसे प्रयत्न हिंदूंच्या न्याय्य मागण्यांसाठी करावे लागले. अहिंसक पद्धतीने आपल्याच देशात आपल्याच श्रद्धेयासाठी चाललेला, असा हा लढा आधुनिक मानवी चळवळींच्या इतिहासात कदाचित एकमेव असावा. पण, डाव्या इतिहासकारांना हा इतिहास खरा वाटतच नव्हता. गोल टोपीचा हिंसक गव्हेरा ज्यांचा आदर्श, त्यांना गोळ्या खाऊन हुतात्मा झालेले कारसेवक कसे जाणवावे?
 
वादग्रस्त ढाँच्याला खणती लावली पुरावे बाहेर आले, तरी न्यायव्यवस्था काही हलायला तयार नव्हती. भारतीय जनता पक्षाने हा विषय ऐन ऐरणीवर आणला. विषयाचे राजकीयीकरण झाल्याचा आरोप व्हायला लागला. खरे तर लोकशाहीत याला आक्षेप असण्याचे काही कारणच नव्हते; कारण लोकशाहीत संसद व लोक हेच कुठल्याही न्यायसुसंगत मागणीचे केंद्र असतात. मात्र, ‘नॅरेटिव्ह’ असा काही निर्माण केला गेला की, ही मागणी राजकीयच आहे. भीती एकच होती. मुसलमानांना काय वाटेल? अटल-अडवाणी जोडीकडे इच्छाशक्ती खूप होती; मात्र संख्याबळ नव्हते.
 
मोदीपर्वाचा आरंभ नेमका इथे आहे. गुजरातच्या दंगलीपासून न केलेल्या गुन्ह्यांची कितीही शिक्षा भोगली असली, तरी मोदींनी स्वत:चे हिंदुत्व बिलकुल सोडले नाही. सत्तेच्या शीर्षस्थ ठिकाणी असा ठाम नेता दृढसंकल्प घेऊन विराजमान झाला की, ‘द अलकेमिस्ट’ या कांदबरीत पावलो कोहेलो म्हणतो त्याप्रमाणे, “सारे विश्वच तुमच्या यशासाठी योजना करायला लागते.” या सोहळ्याचेही तसेच झाले आहे. सगळीकडे मंगल आहे. सारा देश राममय झाला आहे. मुंबईसारखे घड्याळावर चालणारे आर्थिक राजधानीचे शहर आज आनंदाने थबकले आहे. दिवाळीत बाजारपेठा सजतात, तशा दिवे, झेंडे, उपरणी, भगवे सदरे विकणारी दुकाने लागली आहेत. ज्यांना खूप काही शक्य नाही, त्यांनी प्रभू श्रीरामांच्या चित्राचे भगवे ध्वज लावले आहेत.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा जनप्रतिसाद असावा. अर्थात, संघाला याचे श्रेय नको आहे. राम मंदिराचे निर्माण हा हिंदू संघटनेच्या कार्यातला अत्यंत महत्त्वाचा किंवा सर्वात महत्त्वाचा टप्पा मानावा लागेल. श्रद्धास्थानांचा लढा इतक्यात काही थांबणार नाही. कारण, मुळात सांस्कृतिक भारतात मंदिरे हीच सर्व कला व विद्यांच्या उत्कर्षाची केंद्रे होती. विशालकाय स्थापत्याचा मनोहारी नमुना असलेले मीनाक्षीपुरम किंवा बृहदेश्वराचे मंदिर हे हिंदूंच्या भौतिक विकासाचे एक लक्षण आहे. यानिमित्ताने जुन्या सार्‍या कटुता विसरण्याचे आव्हान सरसंघचालकांनी केले आहे. अयोध्येचे वर्णनच मुळी जिथे युद्ध नाही ती नगरी, असे आहे. या नगरीसाठी हिंदू समाजाने केलेल्या संघर्षालाही या मंदिराच्या निर्माणामुळे पूर्णविराम मिळाला आहे. यानिमित्त ज्ञात-अज्ञात अशा सगळ्यांचे स्मरण करीत, आपण या मंगलमय क्षणाचे सहभागकर्ते होऊया!
जय श्री राम! जय जय श्रीराम...
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121