स्वामी विवेकानंदांच्या विचारांमधील रामप्रेरणा

    11-Jan-2024
Total Views | 376
swami vivekananda

भारतीय संस्कृती, धर्म आणि अध्यात्माची पताका जगभर फडकविणारे स्वामी विवेकानंद यांनी अत्यंत तरूण वयात सर्व वेद, उपनिषदे, महाकाव्ये, भगवद्गीता यांचा अभ्यास केला. स्वामीजींनी भारतीय संस्कृतीच्या आदर्शाचा विमर्श तयार करून, पाश्चात्य देशांत सर्वत्र नेला. 12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती त्यानिमित्त त्यांच्या विचारांचे हे ज्ञानमोती.

स्वामी विवेकानंदांनी लहानपणापासूनच आपल्या आईकडून रामायण-महाभारतातील कथा ऐकलेल्या होत्या. पण, गुरू रामकृष्णांच्या देहावसानानंतर आपल्या निवडक गुरुबंधूंसह बागबाजार मठात राहत असताना, त्यांनी पुन्हा वाल्मिकी रामायण, वेद व्यास लिखित महाभारत या ग्रंथांचे व्यवस्थित अध्ययन केले. जेव्हा ते भारतभर परिव्राजक म्हणून भ्रमण करत होते, तेव्हा त्यांनी हेच रामायण आणि महाभारत भारतीयांच्या जनमानसात कसे भिनलेले आहे, याचा अनुभवही घेतला होता. शिकागो सर्वधर्म परिषदेसाठी ते जेव्हा अमेरिकेत दाखल झाले, तेव्हा त्यांनी सर्वधर्म परिषदेआधी आणि नंतरही अमेरिकेत भारतीय संस्कृतीशी निगडित विषयांवर भरपूर व्याख्याने दिली. या सगळ्यानंतर अमेरिका, इंग्लंड आणि युरोपमध्ये ते खूपच प्रसिद्ध झाले.

इतके की त्यांच्या बरोबर त्यांचे अमेरिकेतून आणि इंग्लंडमधून आलेले शिष्यगण भारतातच काय पण इतर परदेश दौर्‍यांतही बरोबर जात असत. अशाच एका 1900 सालातील अमेरिका दौर्‍यात स्वामीजींनी दि. 31 जानेवारी 1900 साली कॅलिफोर्नियातील पॅसाडेना येथील शेक्सपिअर क्लबमध्ये रामायणावरच व्याख्यान दिले आहे. त्यात रामायणातील विविध कथा, विविध पात्रे यांविषयीचे तसेच भारतात त्यांविषयीच्या काय भावना आहेत, या सगळ्याचा उल्लेख केलेला आहे. स्वामीजींनी भारतीय संस्कृतीची महतता सांगताना, तसेच अवघड वेदांत तत्त्वज्ञान सोपे करून सांगताना, कायम रामायण-महाभारतातील कथानकांचा, त्यातील व्यक्तिरेखांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा आधार घेतलेला आहे.

कुणाला वाटेल स्वामी विवेकानंदांनी रामायण किंवा महाभारत यावर काय भाष्य केलंय, त्याच्याशी आता काय देणंघेणं? स्वामीजींचे या दोनही महाकाव्यांतील कथानके, त्यांतील पात्रे यांविषयीचे विचार त्यांची त्यामागची प्रेरणा ही महत्त्वाची आहे.आपल्या व्याख्यानाच्या सुरुवातीसच त्यांनी प्राचीन आर्यावर्ताच्या संस्कृतीची आणि सभ्यतेची ओळख करून देण्यासाठी रामायण या अतिप्राचीन महाकाव्याचा परिचय करून देत आहे, असे सांगितले. यात पुढे त्यांनी संस्कृत भाषेतील अधिकांश साहित्य हे काव्य स्वरुपात छंदबद्ध लिहिलेले आपल्याला सापडते; कारण मौखिक परंपरा. म्हणूनच संस्कृत भाषा दैनंदिन व्यवहारातून हद्दपार होऊन, दोन हजार वर्षे उलटून गेली, तरी त्यातील गेयतेमुळे आणि श्रुती-स्मृती पद्धतीमुळे ते अजूनही जनमानसावर राज्य करते आहे. यात त्यांनी रामायण हे महाभारतापेक्षा जुने असून, त्यालाच आदिकाव्याचा मान मिळालेला आहे, असेही सांगतात. हे काव्य ज्या महाकवींनी लिहिले, त्या महर्षी वाल्मिकींच्या कथेने त्यांनी रामायणाचे कथानक सांगण्यास प्रारंभ केलेला दिसतो.

या कथा सांगताना जिथे-जिथे पाश्चात्यांच्या दृष्टीने एखाद्या नवीन संकल्पनेचे स्पष्टीकरणही त्यांनी दिलेले आहे. यातून आपण परदेशी लोकांपर्यंत आपल्या संस्कृती संदर्भात जी माहिती पोहोचवत आहोत, ती अचूकपणे पोहोचविणे, त्यात त्या लोकांचा कुठेही गैरसमज होऊ नये, या सगळ्याची त्यांनी दक्षता घेतल्याचे दिसते. उदाहरणार्थ, त्यांनी सीता या शब्दाचा अर्थ, तिच्या जन्माची कथा, तिचे पावित्र्य इ. सर्व अतिशय विस्तृत स्पष्टीकरणासह सांगितले आहे. त्यानंतर प्राचीन भारतातील स्वयंवर या विवाह प्रथेविषयी स्प्ष्टीकरण दिलेले आहे. यातून प्राचीन भारतात स्त्रियांच्या मताला महत्त्व होते आणि त्यांना स्वतःचा पती निवडण्याचा देखील अधिकार होता, हे अधोरेखित केले.

पुढे वानर आणि राक्षस या शब्दांविषयी खुलासा करताना, त्यांनी त्या दोनही शब्दांचे अर्थ व्यवस्थित सांगितले आहेत. वनात राहणार्‍या व्यक्तींना आर्यावर्तातील लोक ’वानर’ असे म्हणत असत. त्याचबरोबर त्यांतीलच जे असंस्कृत, अतिशय राकट आणि असाधारण ताकदीचे होते, त्यांना ’राक्षस’ असे संबोधले जात असे. या शब्दांचा अर्थ दक्षिण भारतातील प्राचीन निवासी असा आहे, हे सांगून रामाने माकडांची मदत घेतली, असे चुकीचे विमर्शही खोडून काढलेत. तसेच सीतेच्या शोधार्थ निघालेल्या, राम लक्ष्मणांना सुग्रीवादी वानरांनी आकाशमार्गे जात असलेल्या, रथातून एका आक्रोश करत असलेल्या, सुंदरीने टाकलेला अलंकार दाखवल्यावर, लक्ष्मणाने तो अलंकार ओळखला नाही. पण, रामाने तत्काळ ओळखला. कारण, तो अलंकार सीतेच्या कंठातील होता आणि भारतात वडील भावाच्या पत्नीकडे मोठ्या भक्तिभावाने पाहण्याची प्रथा असल्याने, लक्ष्मणाला तो ओळखता आलेला नाही, हेदेखील स्पष्टीकरण त्यांनी सांगितले.

या सगळ्यातून पाश्चात्यांसमोर भारतीय संस्कृतीची महती सांगण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. स्वामीजींनी रामसेतू बांधण्याची कथा आणि त्यातील खारीची गंमतशीर कथादेखील सांगितलेली आहे. भारतात सगळे रामांना ईश्वराचा अवतारच मानतात, असेही सांगितले. भविष्यात पुन्हा कधी जर कोणी रामाचे अस्तित्व नाकारणे आणि रामसेतू हा अ‍ॅडम्स ब्रिज आहे, असे म्हणावयास सुरुवात केली, तर आपल्याला किमान स्वामी विवेकानंदांनी देखील त्यांच्या परदेशातील व्याख्यानांमध्ये रामसेतू हा वानर सेनेने रामाचे नाव घेऊन बांधला आणि राम हा ईश्वराचा अवतार होता, याचा उल्लेख केला, हे माहिती हवे.रामायणाची रुपरेषा सांगितल्यावर स्वामीजी आवर्जून सांगतात की, भारतातील जनतेचे राम आणि सीता हे आदर्श आहेत. भारतातील स्त्रिया, मुली, बालिका, कुमारिकांची सीतेप्रमाणे विशुद्ध, पतिपरायण आणि सहनशील होणे हीच सर्वोच्च आकांक्षा असते. यातच ते पाश्चात्य आदर्श आणि भारतीय आदर्श यातील फरकही सांगून जातात. पाश्चात्य देश म्हणतात, कर्म करा आणि ते करून आपले शक्ती प्रदर्शन करा; पण भारत म्हणतो, दुःख कष्ट सहन करून सहिष्णुतेद्वारा आपली शक्ती दाखवा.

ते म्हणतात, पाश्चात्यांनी माणूस अधिकाधिक किती संपत्तीचा मालक होतो, हे दाखवून दिले आहे, तर भारतीयांनी माणूस कमीत कमी गरजांमध्ये साधनांमध्ये कसा व्यवस्थित आनंदात राहू शकतो, किती त्याग करू शकतो, हे दाखवून दिले आहे. यातून दोनही विचारसरणींचे खूप वेगळे मनोभाव प्रकट होत आहेत. सीता ही भारतीयांच्या मनोभावाचे प्रतीक आहे. त्यामुळे ती अस्तित्वात होती किंवा नव्हती. तिच्या कथानकाला ऐतिहासिक आधार आहे किंवा नाही हा मुळात प्रश्नच नाही. भारतीय इतकेच जाणतात की, सीतेच्या चरित्रातून जो आदर्श भारतीयांपुढे ठेवलेला आहे. तो भारतात जनमानसात अजूनही विद्यमान आहे. या आदर्शाने समस्त भारत व्यापून टाकलेला आहे. भारतात स्त्रियांना आशीर्वाद देतानादेखील मुली, सीतेप्रमाणे हो असाच आशीर्वाद देतात. सीतेने रामायणात इतके दुःख भोगले तरी श्रीरामांविरुद्ध तिच्या तोंडून एक अक्षरही बाहेर पडलेले नाही. आघातावर आघात केल्याने, पापाची भर पडते, हा भाव सीतेमध्ये कायम विद्यमान होता. म्हणून भोगलेल्या दुःखासाठी बदल्याचा विचारही तिच्या मनास कधी शिवला नाही.
 
सरते शेवटी ते म्हणतात की, पश्चिमेकडील शक्ती प्रदर्शन करण्याची भावना श्रेष्ठ की भारतीयांची कष्ट सहिष्णुता, तितिक्षा श्रेष्ठ हे सांगता येणार नाही. स्वामीजींनी असे म्हणण्यामागे अजून एक कारण असेही असू शकते की, पश्चिमेकडील या राजसी गुणामुळेच पाश्चिमात्य देशांनी खूप प्रगती केली आणि भारतीयांच्या कष्ट सहिष्णुतेमुळे भारतीयांमध्ये एक प्रकारे कोणत्याही अन्यायास प्रतिकार करण्याची इच्छाच नष्ट झाल्याने, घोर क्रियाहीनतेसारखी तामसी वृत्ती वाढल्याने, भारतीयांवर अनेकांनी राज्य केले आणि भारतीयांवर खूप अन्याय झाला. स्वामीजींच्या मते, दोनही आदर्श आपापल्या जागी ठीक आहेत आणि कोणी कोणाला बदलावयास जाऊ नये. दोनही आदर्शांचे लक्ष्य एकच आहे, ते म्हणजे मानवाचे दुःख नाहीसे करणे. भारतीय आणि पाश्चिमात्य आपापले आदर्श चोखाळून आपापले लक्ष्य साध्य करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पाश्चिमात्यांना उद्देशून ते म्हणतात की, तुम्ही भारतीय साधन प्रणाली समजून घ्या. एकमेकांशी कलह न करता, एकमेकांच्या साहाय्याने मार्गक्रमण केले पाहिजे. आपण सगळेच या जीवनात अत्यंत काट्याकुट्यांनी आणि खाचखळग्यांनी भरलेला मार्ग आक्रमित आहोत. त्यामुळे परस्परांना सुयश चिंतुयात.

स्वामी विवेकानंदांनी सीतेच्या मनोधारणेची तुलना भारतीय मनोभावाशी केली आहे. पण, त्यांची अपेक्षा आपल्याकडून आपण सहिष्णू आणि क्रियाशील असावे ना की निष्क्रिय अशी आहे. मला असं वाटतं की, पाश्चात्य संस्कृतीतील चांगल्या गोष्टी घेण्यास स्वामीजींचा विरोध अजिबात नाही. पण, आपली संस्कृती सोडून देता कामा नये, आपल्या संस्कृतीचा आपल्याला विसर पडता कामा नये, अशी स्वामी विवेकानंदांची अपेक्षा होती. प्रचंड शक्ती प्रदर्शनाने माणूस महासत्ता बनण्याकडे वाटचाल करतो; पण यातील धोका असा असतो की, महासत्ता बनली की, अहंकार आला आणि शत्रू आले तसेच दुसर्‍यांना अंकित बनवणं आलं. पण, विश्वगुरू बनण्याकडे वाटचाल करताना, सगळ्यांना बरोबर घेऊन, सगळ्यांना सन्मानाने वागवून वाटचाल होते. ज्यामुळे दुसरे आपोआपच आपल्यापुढे नतमस्तक होतात. गेल्या काही दशकांतील अमेरिका, चीन आणि रशिया यांचे प्रयत्न महासत्ता असणे किंवा महासत्ता बनणे याकडेच आहेत. यामुळे किती युद्धे, किती नरसंहार जगाने पाहिला आहे. पण, भारत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली शांतपणे विश्वगुरू बनण्याकडे वाटचाल करतो आहे. प्रेमाने सगळ्यांना मदतीचा हात पुढे करून आपलेसे करतो आहे. म्हणूनच भारताच्या विरोधात जाण्याची आजमितीला कोणत्याही देशाची हिंमत नाही. जे भारताविरोधात जातील, ते आपोआपच मातीत मिसळून जातील. राम मंदिराच्या उद्घाटनाने याची सुरुवात झालेली आहेच.


-अपर्णा लळींगकर

(लेखिका विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य आहेत, ’एनसीईआरटी’च्या गणिताच्या नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या सदस्य आहेत.
केंद्र सरकारच्या नॅशनल काऊंसिल फॉर ट्रान्सजेंडर या समितीवर एक्सपर्ट मेंबर म्हणून आहेत.)




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121