भाजपा शिवसेना राष्ट्रवादीसह महायुतीचे संयुक्त आढावा बैठकांचे सत्र!

३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी बैठका होणार असल्याची आमदार प्रसाद लाड यांची माहिती

    29-Aug-2023
Total Views |
 
Prasad Lad
 
 
मुंबई : भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासह महायुतीतील घटक पक्षांची संयुक्त आढावा पार पडणार असून, ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी या बैठका आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महायुतीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे. या बैठकांबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, महायुती समन्वय समितीचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा चित्राताई वाघ, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये आणि भाजप मिडिया प्रभारी नवनाथ बन उपस्थित होते.
 
महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेससह आरपीआय (आठवले गट), आरपीआय (जोगेंद्र कवाडे गट), बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर, जन सुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर, प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत उपस्थित राहणार आहेत. हे सर्व घटक पक्ष या बैठकांना उपस्थित राहणार असून, दिनांक ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ८ वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सर्व प्रमुख नेते व मंत्री यांच्यासह भोजन कार्यक्रम व चर्चा असा कार्यक्रम ठरलेला आहे. त्याचप्रमाणे १ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून तिन्ही पक्षांचे सर्व आमदार, खासदार, सर्व संपर्क प्रमुख, नेते आणि जिल्हाध्यक्ष तसेच विधानसभा प्रमुख यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे.
 
१ सप्टेंबर रोजी या बैठकांचे सत्र सुरु झाल्यानंतर मुंबई कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अशा सर्व क्षेत्रातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार असून, वरळी येथे या बैठका पार पडणार आहेत. आमची ही आढावा बैठक पूर्व नियोजित होती, त्याचप्रमाणे मुंबईती विरोधकांची जी बैठक होत आहे, त्यातून काहीच निष्पन्न होणार नसल्याचे मत यावेळी मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.