दिसपुर : आसाममधील काछारमध्ये एका मदरशात एका अल्पवयीन विद्यार्थ्याची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. मृत विद्यार्थ्याचा मृतदेह दि. १३ ऑगस्ट रोजी सापडला. रहमान खान असे आरोपीचे नाव असून तो याच मदरशाचा इमाम आहे. रहमान खानला पोलिसांनी अटक केली आहे. मदरशातून न सांगता बाहेर जाणे हेच हत्येचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाने मदरसा सील करून तपास सुरू केला आहे.
ही घटना काछार जिल्ह्यातील लैलापूरची आहे. येथे रहमान खान दारुस सलाम हाफिजिया मदरशात इमाम म्हणून काम करतात. मदरशात एक वसतिगृह आहे जिथे सर्व विद्यार्थी राहून धार्मिक शिक्षण घेतात. सुमारे ३ महिन्यांपूर्वी एका १२ वर्षीय विद्यार्थ्याने येथे प्रवेश घेतला होता. घटनेच्या दिवशी तो इमामला न सांगता वसतिगृहातून निघून गेला होता, असे सांगण्यात येत आहे. याचा राग इमाम रहमान खान याला आला आणि त्यांने याच रागातून विद्यार्थ्याची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
वसतिगृहात विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला. पीडिताचे साथीदार सकाळी नमाज अदा करण्यासाठी त्याला उठवण्यासाठी गेले असता ही घटना उघडकीस आली. पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान विद्यार्थ्याची हत्या झाली असावी, अशी भीती व्यक्त होत आहे. मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. प्रत्यक्षदर्शीच्या जबाबाच्या आधारे आरोपी इमामला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध आयपीसी कलम ३०२ (हत्या) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपी रहमान खान याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. मृत विद्यार्थ्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सिलचर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला आहे.
दरम्यान आरोपी त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळत असल्याचे सांगण्यात येत आहे. काही वृत्तानुसार, मदरशातील १३ इतर विद्यार्थ्यांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी मदरसा सील केला आहे. काछार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नुमल महत्ता यांनी माध्यमांशी बोलताना या कारवाईला दुजोरा दिला आहे.