‘शांतीवन’ : सेवेचे व्रत

    15-Aug-2023
Total Views | 84
Article On Dipak Nagargoje Shantivan project

विचारांचा वारसा, सामाजिक जाणिवेचा आणि समाज परिवर्तनाचा वसा, दीपक नागरगोजे यांना समाजसेवक बाबा आमटे यांच्याकडून मिळाला. बीड जिल्ह्यातील आर्वी या छोट्याशा खेडेगावात वसलेल्या दीपक नागरगोजे यांच्या ‘शांतीवन’ या प्रकल्पाची माहिती देणारा हा लेख...

गुरु ने दिला ज्ञानरुपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
बाबा आमटे यांच्या ‘सोमनाथ प्रकल्पा’त श्रम संस्कार शिबिरात सहभागी होण्याची संधी दीपक दादांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. १७-१८ वर्षांच्या वयात बाबांच्या विचाराचं गारूड घेऊन दादा शिबिरातून घरी परतले. त्यावेळी ते बारावीत होते, अभ्यासात हुशार होते, घरची परिस्थितीदेखील चांगली होती. साहजिकच घरच्यांना दादांनी डॉक्टर, इंजिनिअर व्हावे, असे वाटत होते. परंतु, दादाच्या मनात सामाजिक कार्याचे विचार घोळत होते. बाबांच्या कार्याने प्रेरित झालेल्या दादांना सामाजिक क्षेत्रात काम करण्याची ओढ लागली, त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले आणि बारावीच्या परीक्षेत अपयश आले.

घरचे थोडे नाराज झाले. एकत्र कुटुंब पद्धती असल्याने त्यांच्या काकांबरोबर गावी शेती करू लागले; पण त्यांच्या मनातील विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. पर्यटक म्हणून या आणि परिवर्तक म्हणून जा! ही नवतरुणांना बाबांनी घातलेली साद त्यांच्या मनात घर करून राहिली होती. त्याचवेळी समाजासाठी जगण्याचे, त्यांनी निश्चित केले. चाकोरीबद्ध आयुष्याला छेद देत एक दिवस सरळ घर सोडले आणि बीडमध्ये एका दैनिकात नोकरी धरली. वर्तमान पत्रात काम करताना खर्‍या अर्थाने बीड जिल्ह्यातील सामाजिक समस्यांचा अभ्यास करता आला. प्रदेश बदलला की, समस्या बदलतात,
 
आनंदवनाची बेटे तयार झाली पाहिजेत, असा बाबांचा आग्रह कशासाठी आहे, हे लक्षात आले. बीड जिल्हा अनंत प्रश्नांनी ग्रासलेला, प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती, निसर्गाचा लहरीपणा, दर तीन वर्षांनी हमखास पडणारा दुष्काळ, या सगळ्यामुळे शेतकरी होरपळून जातो. शेती कायम तोट्याचीच ठरते. येथील चार ते पाच लाख लोक पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडणीसाठी जातात. या ऊसतोडीत कित्येक बालकांचे आयुष्य कोमेजून जातं. त्याचं शिक्षण थांबत, कित्येक बालमृत्यू होतात, तर काहीवेळा पालक मृत्युमुखी पडल्यामुळे अनाथपण येत. या एका प्रश्नाचे अनेक कंगोरे अभ्यासताना, या प्रश्नावर उत्तर म्हणून अनाथ वंचित मुलांसाठी संगोपन आणि शिक्षणाचे काम सुरू करण्याचं ठरवलं आणि ‘शांतीवन’चा जन्म झाला.

दरम्यानच्या काळात लग्न झाले आणि कावेरीने सहचारिणी म्हणून आयुष्यात प्रवेश केला. खर्‍या अर्थाने सहचारिणीचा धर्म कावेरी आजपर्यंत पाळत आहे. लग्न झाल्यावर लगेच आनंदवन येथे जाऊन संपूर्ण आमटे कुटुंबाची भेट घेऊन प्रकल्प आधारित काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि तिथून परत आल्या बरोबर आर्वी येथे स्वतःच्या शेतात या प्रकल्पाची स्थापना झाली. कावेरी बरोबर संसाराला सुरुवात झाली, ती ५० अनाथ लेकरांना घेऊनच, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एका पत्र्याच्या शेडमध्ये हा संसार थाटला. तो काळ खूप कठीण होता. दुर्गम भागात पोटासाठी संघर्ष करणार्‍या लोकवस्तीत काम चालू ठेवणं खूप कठीण होतं. परंतु, जिथे गरज आहे, तिथेच प्रकल्प चालवायचा, या जिद्दीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, हे काम पुढे जात होतं.

घरची शेती पिकवायची. त्यातून मिळणारा धान्य लेकरांना खाऊ घालायचं, त्यातून भागायचं नाही, मग काही दात्यांना शोधून काहीतरी घेऊन यायचं. ही भाकर, चटणी खाऊ घालताना, झालेली दमछाक मात्र मुलांच्या निर्मळ हास्याने दूर व्हायची लेकरं जगवण्याचा जगवण्याचा, शिकवण्याचा, हा संघर्ष चालू असतानाच बालघाटात, डोंगरात उन्हा उन्हात वंचित, अनाथांचा शोध चालू होता. अंगावर काटा आणणार्‍या आतून पार हादरवून टाकणार्‍या कहाण्या रोज नव्याने समोर येत होत्या. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक पातळीवर, एकाचवेळी आमचा संघर्ष चालू होता. अत्यावश्यक असणार्‍या भौतिक गरजा भागवण्याची, सुविधा ही उपलब्ध नव्हत्या.

स्वप्नं खूप होती; पण ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारा आर्थिक पाठबळ नव्हतं. परंतु, प्रचंड इच्छाशक्ती मात्र होती. आनंदवनाने उभे केलेले स्वावलंबनाचे मॉडेल भविष्यात आपल्याकडे राबवायचं, हे नक्की होतं. त्यासाठी आनंदवनात काही महिने मुक्कामी राहून कावेरीने सगळ्या उपक्रमांचे ट्रेनिंग घेतले. ‘शांतीवन’चे काम असेच पुढे जात होते. आनंदवनातील कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन आणि पाठिंबा कायमच मिळत होता. पण, प्रकल्प चालवताना रोज एक नवीन अडचण समोर उभी राहत होती. आनंदवनाचे सचिव डॉक्टर विकास आमटे यांच्या जवळ या अडचणी सांगितल्यानंतर, त्यांनी ‘शांतीवन’च्या मदतीसाठी ‘स्वरानंदवन’ या त्यांच्या विशेष वाद्यवृंदाचे सात प्रयोग बीडमध्ये केले.

संस्थेच्या अगदी पडत्या काळात, झालेली ही मदत संस्थेला नवसंजीवनी देणारी ठरली. आनंद वनातील अंध, अपंग मूकबधीर, महारोगी बांधवांचे ’शांतीवन’च्या उभारणीसाठी दिलेले, हे महत्त्वाचे योगदान आहे. या कार्यक्रमामुळे ‘शांतीवन’चे कार्य बीडमध्ये घराघरात पोहोचले. ’शांतीवन’चे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात बीड येथील पत्रकार व प्रसारमाध्यमे, यांचा खूप मोठा वाटा आहे. असेच अनुभव मासिकातील लेख वाचून ठाण्याच्या उज्ज्वला बागवाडे यांनी प्रकल्पाला भेट दिली. मदत करण्याच्या हेतूने त्यांनी आपल्या मैत्रिणींना एकत्र आणले आणि व ’वुई टुगेदर फाऊंडेशन’ धान्य बँक कन्सेप्ट, जन्माला आली. आज ही धान्य बँक अनेक संस्थांसाठी अन्नपूर्णा बनली आहे.

वीणाताई गोखले यांच्या ’देणे समाजाचे’ या उपक्रमामुळे अनेक देणगीदार हितचिंतक मिळाले. तसेच सचिन तेंडुलकर डॉ. मंदार परांजपे, सुनंदन लेले, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे या दिग्गज मंडळींचा ’शांतीवन’च्या उभारणीत मोठा वाटा उचलला आहे, तर ’शांतीवन’ नावारुपाला येण्यासाठी उज्वला बागवाडे, नरेंद्र काका मिस्त्री, मिलिंद वैद्य या लोकांच्या प्रयत्नांमुळे शांतीवन नावारुपाला आले आहे. आता या प्रकल्पात ३०० मुलं शिक्षण घेत आहेत. या प्रकल्पात प्रवेश केल्या-केल्या अत्यंत सकारात्मक, प्रसन्न वातावरण अनुभवाला मिळत कुठल्याही मुलाच्या चेहर्‍यावर त्याचं वंचितपण, अनाथपण त्यांच्या चेहर्‍यावर किंवा देहबोलीत दिसत नाही.
 
योग, नृत्य कला, स्तोत्र पठण, संगणक शिक्षण इत्यादी गोष्टी इथे नित्यनेमाने करून घेतल्या जातात. स्वावलंबन, पाण्याचा कमीत कमी आणि योग्य वापर यांनी अंगीकारला आहे.‘शांतीवन’चे पुढचे पाऊल, म्हणून पुण्यात ‘आजोळ’ या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आलेली आहे. याअंतर्गत पुण्यामध्ये उच्च शिक्षणासाठी मुले व मुली ठेवली आहेत. आजच्या स्थितीला उच्च शिक्षणासाठी १०० मुलं बाहेर आहेत. त्यातील १८ मुले ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेत आहेत, मुली ’बीएससी नर्सिंग’ करून आता स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. एक मुलगा कृषी अधिकारी झाला आहे. काही मुले इंजिनिअर, तर अनेक मुलं शिक्षक झालेली आहेत आणि स्वतःच्या पायावर उभी आहेत. अनाथ मुलांच्या संगोपनासाठी सुरू झालेला ‘शांतीवन प्रकल्प’ आज विविध प्रश्नांवर काम करणारी चळवळ बनली आहे.

आज ११ प्रकल्प ‘शांतीवन’च्या माध्यमातून राबवले जातात. शून्य ते सहा वयोगटासाठी दत्तक विधान केंद्र मुलींसाठी बालगृह, वसतिगृह, शाळा विधवा महिला पुनर्वसन, शेतकरी मनोबल प्रकल्प, अशा विविध प्रकल्पाच्या माध्यमातून इथे काम केले जाते. शेतकरी मनोबल प्रकल्पात कमीत कमी पाण्यावर शेती करण्याचे प्रयोग सिद्ध झाला आहे. शेतकर्‍यांनी यासाठीच्या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. एक हजार एकराच्या जमिनीवर हा प्रयोग यशस्वी ठरला आहे, शेतकर्‍यांसाठी हा प्रकल्प पथदर्शी ठरला आहे. ‘शांतीवन’च्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष दीपक नागरगोजे आणि सगळे संस्थेचे सभासद, सुरेश जोशी, शालन मेस्त्री, शशिकांत चितळे, उज्वला बागवडे, परीक्षित ठाकूर श्रद्धा वर्धमाने, हेमंत डोंगरे खूप मेहनत घेत आहेत. मराठवाड्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. आज ‘शांतीवन’ प्रकल्प अनाथ वंचित ऊस तोडणी कामगार तमासगीर आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याप्रती वरदान ठरला आहे. शांतीवनाच्या सहकार्याने खरेच या गरजू लोकांच्या जीवनात स्थैर्य आणि शांती आली आहे.
 
कल्याणी काळे
९८१९२२६०६७

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121