मुंबई : गेला काही काळ चित्रपटांच्या बाबतीत अपयशच हाती आलेला अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'ओह माय गॉड २' हा चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच या चित्रपटाचा टीझर आणि पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीसाठी आले. तर आज या चित्रपटातील ‘हर हर महादेव’ हे दुसरे गाणे प्रदर्शित झाले. परंतु, ११ ऑगस्ट रोजी देशभरात प्रदर्शित होणाऱ्या ‘ओह माय गॉड २’ या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे जाणार असे वृत्त समोर येत आहे.
काही दिवसांपुर्वी चित्रपटातील काही दृश्य आणि इतर बाबींमुळे चित्रपटाला सेन्सॉर बॉर्डाकडून ए सर्टिफिकेट दिले जात नव्हते. मात्र, आता या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ए सर्टिफिकेट देण्यात आले असून हा चित्रपट फक्त १८ वर्षांवरील प्रेक्षक पाहू शकतात. याच कारणामुळे अक्षयच्या या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाईल, असं समोर आलं आहे. ‘ई-टाईम्स’ ने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाला मिळालेले ए सर्टिफिकेट व आक्षेपार्ह दृश्य काढून टाकण्याचा सेन्सॉर बोर्डच्या सूचनेमुळे निर्माते नाराज झाले आहेत.
‘ई-टाईम्स’शी बोलताना निर्माते म्हणाले की, “चित्रपटाच्या प्रदर्शनाची ११ ऑगस्ट ही तारीख पुढे ढकलली जाईल. कारण आम्ही सेन्सॉर बोर्डानं घेतलेल्या निर्णयाविरोधात लढू इच्छित आहोत. चित्रपटाची योग्य प्रसिद्धी आम्हाला करायची आहे.” सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख अक्षय ठरवणार आहे. अक्षय सध्या भारतात नसून तो चित्रिकरणासाठी परदेशात आहे.