नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, हे सिद्ध करण्यास सांगणारी नोटीस केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटास बजाविली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच पक्षावरील हक्क सिद्ध करण्याच आव्हान शरद पवार यांच्यापुढे उभे राहिले आहे.
राष्ट्रवादी पक्षामध्ये शरद पवार यांच्याविरोधात बंड करून अजित पवार हे एनडीएसोबत आले आहेत. ते सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचेही घोषित केले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले असून हा तिढा आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरील हक्क सिद्ध करण्यासाठी नोटीस बजावली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर ही नोटीस बजावण्यात आली आहे.
अजित पवार गटाने ३० जून रोजी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे सांगितले होते की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी स्वाक्षरी केलेल्या ठरावाद्वारे पक्षाच्या प्रमुखपदी आपली निवड करण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून कायम राहतील. खरी राष्ट्रवादी कोणासोबत राहणार, हे निवडणूक आयोगाला ठरवायचे आहे.