इस्लामसाठी जिहाद करण्याचे ब्रेन वॉशिंग; पोलीस तपासातून माहिती उघड
पुणे, सातारा, कोल्हापुरात वावर; जंगलामध्ये दहशतवाद्यांनी केली स्फोटाची चाचणी
26-Jul-2023
Total Views | 74
पुणे : पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांचे इस्लामची शिकवण असलेल्या पवित्र गोष्टींसाठी बलिदान देणे, जिहाद करणे यासाठी ब्रेन वॉशिंग करण्यात आलेले होते. त्यामधूनच त्यांनी दहशतवादाचा मार्ग अवलंबून त्याचे प्रशिक्षण घेतले. धर्मासाठी जिहाद करुन जन्नत प्राप्त करण्याची या दोघांनी मानसिकता तयार केली होती असे तपासात समोर आले आहे. आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. सत्र न्यायाधीश एस. व्ही. कचरे यांनी दोघांच्या पोलिस कोठडीत पाच ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.
महंमद युनूस महंमद याकू साकी (वय, २४) आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय २३) अशी या दहशतवाद्यांची नावे असून कोथरुड पोलीस ठाण्याच्या रात्र गस्तीवरील पोलिसांनी वाहनचोरीच्या संशयावरुन त्यांना पकडले होते. या दोघांवर राजस्थानमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याचा कट रचल्याचा गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून दीड वर्षे हे दोघे फरार होते. त्यांच्यावर प्रत्येकी पाच लाखांचे बक्षिस आहे. या दोन्ही दशहतवाद्यांनी बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले होते.
दरम्यान, एटीएसने घेतलेल्या घरझडतीमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह चार किलो पांढरी पावडर जप्त करण्यात आली होती. एक्स्प्लोसिव्ह वेफर डिटेक्टरद्वारे केलेल्या तपासणीमध्ये ही पावडर स्फोटकांचीच असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, पोलिसांच्या श्वान पथकाने देखील त्याची पुष्टी केली आहे. त्याचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. जप्त केलेल्या पेन ड्राइव्हमधील डाटा नुसार देशविघातक कारवाई केली जाणार होती हे समोर आले आहे. या माहितीचा ४३६ पानांचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे.
तसेच, तपासामध्ये दिवसागणिक नवनवीन माहिती उजेडात येत असून दहशतवाद्यांनी पुणे, सातारा आणि कोल्हापुरातील जंगलांमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याची चाचणी केल्याचे समोर आले आहे. पुण्यात दुचाकीचा वापर करुन स्फोट घडविण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. या दोघांना वाहनचालक दहशतवाद विरोधी पथकाकडून न्यायालयात सादर करण्यात आलेल्या तपासाच्या अहवालात ही माहिती नमूद करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींच्या गुन्ह्यांमध्ये बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) कलमाची वाढ केली आहे.