ज्ञानवापी पुरातत्व सर्वेक्षणास सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती
24-Jul-2023
Total Views | 41
नवी दिल्ली : ज्ञानवापीमध्ये एएसआयकडून करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (२४ जुलै २०२३) आदेश दिला की, वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने २१ जुलै रोजी दिलेल्या आदेशाला २६ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्थगिती दिली जात आहे. तोपर्यंत 'मशिद समिती' या निर्णयाला आव्हान देण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
सोबतच जिल्हा न्यायालयाने अपील करण्यासाठी वेळ द्यायला हवा होता, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी हा आदेश सुनावण्यात आला, त्यामुळे 'मशिद कमिटी'ला त्याविरोधात अपील करण्यास वेळ मिळाला नाही. सर्वोच्च न्यायालयाने मशिद कमिटी'ला उद्याच उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले. यासोबतच सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाला २६ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजेपूर्वी सुनावणी करण्यास सांगितले आहे.
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. 'ज्ञानवापी अंजुमन इस्लामिया मशिद कमिटी'ने यासंदर्भात तात्काळ सुनावणीसाठी याचिका दाखल केली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आणि त्यावर सुनावणीही झाली.
वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाला परवानगी दिली होती. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, आदेशानंतर ज्ञानवापीमध्ये सुरू झालेले सर्वेक्षण थांबवण्यात आले आहे. त्यानंतर हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले की, आम्ही आमची बाजू अलाहाबाद उच्च न्यायालयातही मांडू. त्यांनी 'मशिद कमिटी'वर सर्वोच्च न्यायालयासमोर खोटी विधाने केल्याचा आरोप केला.