पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक, रेल्वेमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
03-Jun-2023
Total Views | 83
नवी दिल्ली : ओदिशामधील बालासोरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघाताची सखोल चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बालासोर येथे दिले आहे. ओदिशामधील बालासोर येथे शुक्रवारी सायंकाळी बंगळुरू – हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस, शालीमार चेन्नई – कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्या विचित्र अपघातामध्ये आतापर्यंत २५० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत, तर ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची तीव्रता अतिशय गंभीर असून त्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दुपारी बालासोर येथे अपघातस्थळी भेट दिली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अपघातस्थळाची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींचीही विचारपूस केली. यावेळी त्यांनी घटनास्थळावरूनच कॅबिनेट सचिव आणि आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी जखमींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत देण्याचे, शोकग्रस्त कुटुंबीयांची गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भयानक अपघातामुळे मनास अपार वेदना झाल्या आहेत. या अपघातात प्रत्येक प्रवाशाने काहीना काही गमावले आहे, तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. जखमी झालेल्या कुटुंबीयांना उत्तम आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. केंद्र सरकारसाठी ही अतिशय गंभीर घटना असून त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे. या घटनेमध्ये दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. अपघातानंतर ओदिशा सरकार आणि प्रशासनाने तत्काळ नागरिकांची केलेली मदत, ओदिशातील नागरिकांनी याप्रसंगी केलेले रक्तदान, मदतकार्यातील सहभाग यामुळे त्यांचे कार्य वंदनीय आहे. त्याचप्रमाणे रेल्वेखातेदेखील याप्रसंगी पूर्ण क्षमतेने मदतकार्यात गुंतलेले आहे. त्याचप्रमाणे रेल्वे वाहतूकदेखील लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी काम सुरू असल्याचीही माहिती यावेळी पंतप्रधानांनी दिली.
दरम्यान, या गंभीर घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुपारी उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्रिमंडळाचे सचिव राजीव गौबा, रेल्वे खात्यातील वरिष्ठ अधिकारी आणि अन्य उच्च अधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे या घटनेविषयी देशातील सर्व मुख्यमंत्री, राजकीय पक्षांचे नेते आणि प्रमुख यांच्यासह विविध देशांच्या प्रमुखांनीदेखील शोक व्यक्त केला आहे.
असा झाला अपघात
२ जून रोजी सायंकाळी बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस हावडाकडे जात असताना अनेक डबे रुळावरून घसरले. दुसरीकडे, शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस या एक्स्प्रेसच्या डब्यांना धडकली. यानंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबेही समोरून येणाऱ्या मालगाडीच्या डब्यांना धडकले. बालासोर जिल्ह्यातील बहाना बाजार स्थानकाजवळ हा भीषण अपघात झाला आहे.