मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. रविंद्र वायकर यांच्या जोगेश्वरीतील पंचतारांकित हॉटेलचा घोटाळा सिद्ध झाला असून ते उद्धव ठाकरे यांचे भागीदार आहेत. अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली. शिवाय, राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेला वायकर यांच्या घोटाळ्यावर ताबडतोब कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वायकरांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे करणार असल्याची माहिती सोमय्या यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
सोमय्या म्हणाले, "२०२१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कृपेने श्री. रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी येथील व्यावली गावात सर्व्हे क्र. १- बी, १-सी यावर २ लाख स्के. फि. ५ स्टार हॉटेलचे बांधकाम करण्याची परवानगी मुंबई महापालिकेने दिली. ही जागा खेळाचे मैदान म्हणून आरक्षित आहे/होती. रवींद्र वायकर यांनी ९ फेब्रुवारी २००४ रोजी मुंबई महापालिकेचे नियम, DCPR १९९९ च्या अंतर्गत या खेळाच्या मैदानाचा १५%, काही स्पोर्ट्स एज्युकेशन सेंटर म्हणून विकसित करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्या समोरील उर्वरित मैदान हे कायमचे मैदान म्हणून आरक्षित राहणार आणि recreation ground म्हणूनच त्याचा वापर भविष्यात केला जाणार अशा प्रकारचे वचन दिले होते."
"मुंबई महानगरपालिका, रवींद्र वायकर आणि महल पिक्चर्स प्रा. लि. (श्री. अविनाश भोसले व श्री. शहीद बालवा यांच्या मालकीची कंपनी) यांच्या बरोबर "त्रिपक्षीय करार" ही झाला होता आणि या भागावर भविष्यात कधीही रवींद्र वायकर त्यांची कंपनी हक्क सांगणार नाही, बांधकाम, डेव्हलपमेंट राईट मागणार नाही अशा प्रकारचा करार करण्यात आला होता. म्हणजेच उर्वरित मैदान हे महापालिकेचे मैदान झाले होते."
"२०२१ मध्ये रवींद्र वायकर यांनी ही गोष्ट लपविली, मुंबई महापालिकेची फसवणूक केली अर्थात ही गोष्ट मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाही माहिती होती, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही माहिती होती आणि ५०० कोटी रुपयांचे ५ स्टार हॉटेलसाठी ही जागा वापरण्यासाठी उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेने परवानगी दिली. गेले २ वर्षे या विषयावर मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र सरकार यांच्याशी आम्ही पाठपुरावा होतो. सप्टेंबर २०२२ नंतर या विषयावर चौकशी सुरु झाली आणि मुंबई महानगरपालिकेने २१ फेब्रुवारी २०२३ रोजी या संबंधात रवींद्र वायकर यांना नोटीस दिली, स्पष्टीकरण मागविले."
"काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार नगरविकास मंत्रालयाने मुंबई महानगरपालिकेला या संबंधी कारवाई करण्यासाठी निर्देश दिले. मुंबई महानगरपालिकेने आता १५ जून २०२३ रोजी वायकर यांना या हॉटेलची परवानगी रद्द करण्यात येत आहे असा आदेश दिला आहे." अशी माहिती सोमय्या यांनी पत्रकार परिषदेतून दिली.