मुंबई : येत्या शनिवारी ठाकरे गट प्रमुख उध्दव ठाकरे बारसूला भेट देणार आहेत. तेथील आंदोलकांशी चर्चा करणार असल्याचे वांद्रे कुर्ला संकुलात आयोजित वज्रमूठ सभेत म्हणाले. आणि त्यानंतर तेथून महाडच्या सभेस जाणार असल्याचे स्पष्ट केले.
राज्यात सध्या रत्नागिरी येथील बारसू ‘रिफायनरी’वरून सत्ताधारी आणि महाविकास आघाडीत (मविआ) संघर्ष सुरू आहे. त्यातच सोमवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘रिफायनरी’ प्रकल्पाला विरोध दर्शवित, तेथील आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी शनिवार, दि. 6 मे रोजी बारसूला जाणार असल्याचे स्पष्ट केले. वांद्रे-कुर्ला संकुलात महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा सोमवारी सायंकाळी पार पडली, त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, “राज्यात एक विषय भडकलेला आहे बारसू. बारसूबाबत मी फक्त या सभेतच बोलणार नाही, तर शनिवार, दि. 6 मे रोजी मी बारसूमध्ये जाऊन तिथल्या लोकांना भेटून बोलणार आहे. मला तिथे जाण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. बारसू काय पाकव्याप्त काश्मीर किंवा बांगलादेश नाही.” मी 6 तारखेला पहिल्यांदा बारसूला जाणार आणि त्यानंतर महाडच्या सभेला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चुकांचा पाढा वाचत यावेळी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.या वज्रमूठ सभेला मुंबई काँग्रेस प्रमुख भाई जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार तथा विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच, मविआचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते.