मुंबई : सामान्य जनतेमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनबाबत अनेक गैरसमज होते. त्यामुळे पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी सातत्याने केली जात असते. लोकसभा, विधानसभासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतपत्रिकांचा वापर करावा अशी मागणी विरोधकांकडून केला जात आहे. मात्र आता शेजारच्याच देशात पुन्हा बॅलेट पेपवर निडणूका होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भारतात 2019 मध्ये जेव्हा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी काही राजकीय पक्षांकडून करण्यात येत होती. त्यावेळी निवडणूक आयोगाने यापुढे मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर होणार नाही असे स्पष्ट सांगितले होते. तसेच त्यावेळचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आता ईव्हीएमवरच निवडणूक घेण्यात येईल असं स्पष्ट केले होते.
तर आता बांग्लादेशात पुन्हा एकादा बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जाणार आहेत. बांगलादेशच्या शेख हसीना यांच्या सरकारने यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत ईव्हीएमचा वापर न करण्याचे ठरवले आहे. शेख हसीना यांच्या सरकारने ईव्हीएम काढून टाकण्याची आणि बॅलेट पेपरद्वारे देशात लोकसभा निवडणूक घेण्याची विरोधकांची मागणी मान्य केली आहे.