बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यातील ३० ते ४० हजार शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळाला नसल्याचे वक्तव्य आहे. अनेक शेतकऱ्यांना तफावतीची रक्कमही मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. आठ दिवसांत शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्यास पुन्हा एकदा आर या पारचे आंदोलन करण्याचा इशारा तुपकरांनी दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षकांची भेट घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. २० मार्चपर्यंत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना कृषी अधीक्षकांनी AIC कंपनीला दिल्या आहेत. त्यामुळे कंपनी आता २० तारखेपर्यंत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार का? हे पाहावं लागेल. जर एका आठवड्यात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाहीतर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा तुपकरांनी दिला आहे.
दरम्यान, आम्ही २८ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्हा कृषी अधीक्षकांच्या दालनात केलेल्या आंदोलनानंतर नामंजूर असलेल्या शेतकऱ्यांनाही आम्ही पीक वीमा देऊ असं लेखी आश्वासन कंपनीने दिले होते. त्यानुसार नामंजूर असलेले शेतकरी देखील पीक विम्यापासून वंचित असल्याचे तुपकर यावेळी म्हणाले. बुलढाणा जिल्ह्यातील उर्वरित पीक विम्यासाठी काल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोषजी डाबरे यांची तुपकरांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे.