नवी दिल्ली : रमजानच्या महिन्यात ज्ञानवापी संकुलातील कथित मशिदीच्या आवारात वजू करण्याच्या मुस्लिमांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात १४ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. रमजानच्या महिन्यात ज्ञानवापी संकुलात असलेल्या कथित मशिदीच्या आवारात वजू करण्याची म्हणजेच हात-पाय धुण्याची परवानगी मिळावी यासाठी मुस्लिम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील हुजेफा अहमदी यांनी या याचिकेचा उल्लेख केला.
याचिकेत म्हटले आहे की, रमजानमुळे रोजेदार मोठ्या संख्येने मशिदीत नमाज अदा करण्यासाठी येत आहेत. अशा स्थितीत उपवास करणाऱ्या व्यक्तीला वजू करता येईल अशा पर्यायी जागेची व्यवस्था करावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
धार्मिक कारण पाहता या याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्यात यावी, अशी आग्रहाची विनंती मुस्लिम पक्षातर्फे करण्यात आली. मात्र, सरन्यायाधीश न्या. चंद्रचूड यांनी याप्रकरणी १४ एप्रिल रोजी सुनावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, ज्ञानवापी – काशी विश्वनाथ प्रकरणाच्या सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी करण्यात यावी या हिंदू पक्षाच्या याचिकेवर २१ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.