राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती २०२२-२०२३च्या निमित्ताने ‘सेवा भवन’ या सात मजली वास्तूचे लोकार्पण सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते आज, शनिवार, दि. ४ मार्च रोजी पुण्यात होत आहे. यानिमित्ताने या प्रकल्पाची ओळख करून देणारा लेख.
सेवा भवन
रा. स्व. संघ जनकल्याण समिती ही सेवाकार्यांच्या रूपाने तेवणारी प्रेरक सेवा ज्योत आहे. ‘समाजाकडून समाजाला’ या तत्त्वावर जनकल्याण समिती लोकसहभागातून निधी उभारून सेवा भवनसह नऊ मोठे सेवा प्रकल्प चालवत आहे. याव्यतिरिक्त सात विषयांमधील २८ प्रकारची १८८० सेवाकार्ये जनकल्याण समितीतर्फे सुरू आहेत. ३८० शाळांमध्ये फिरती विज्ञान प्रयोगशाळा १,०३९ आरोग्यरक्षक, १८५ रुग्णोपयोगी साहित्य केंद्रे, आठ पूर्वांचल छात्रावास आणि नैसर्गिक दुष्काळ, भूकंप, पूर इ. संकटे, कोरोना आदी प्रकारच्या आपत्ती निवारणाचे कार्य जनकल्याण समिती गेली ५० वर्षे अविरतपणे करत आहे.
आपल्या कार्यातून जनसामान्यांच्या मनातील परस्पर सहसंवेदना, आत्मीयता, भ्रातृभाव जनकल्याण समितीने जागता ठेवला आहे. या सेवाकार्यात फार मोठा विश्वास कार्यकर्त्यांच्या निरपेक्ष व निरंतर सेवेतून मिळविला आहे. त्यामुळे समाजाच्या व सज्जन शक्तीच्या दातृत्व व सहभागातून अनेक सेवाकार्ये, अनेक प्रकल्प, सढळ आर्थिक मदतीतून निर्माण झाले व सेवा भवनसारखी देखणी वास्तू हे त्याचे दृश्य स्वरूप आहे.
राजगुरुनगर (खेड) येथील ज्येष्ठ संघ स्वयंसेवक नारायणकाका दाते यांनी इच्छापत्राद्वारे पुण्याच्या एरंडवणे, पटवर्धन बाग येथील ६,५०० चौ. फुटांचा भूखंड सेवा कार्यासाठी जनकल्याण समितीला दिला. मुकुंदराव पणशीकरांच्या प्रयत्नांतून त्याची अंमलबजावणी होऊन सेवा भवनाची निर्मिती व्हावी, अशी कल्पना पुढे आली. ती आता प्रत्यक्षात साकार झाली आहे.सामान्य जनतेमध्येही सेवा सहभागाची भावना सतत जागृत ठेवणार्या राष्ट्र संरक्षण व राष्ट्र विकासासाठी सक्षम होत असणार्या असंख्य सेवा संस्था या भारतात कार्यरत आहेत. रा. स्व. संघ जनकल्याण समितीही (महाराष्ट्र प्रांत) यात विशेषत्वाने अग्रेसर असून संस्थेने समाजात विश्वासार्हता प्राप्त केली आहे.
जनकल्याण सेवा फाऊंडेशन, डॉ. हेडगेवार सेवा स्मारक निधी व जनकल्याण समिती या तीन संस्थांनी एकत्रितपणे सेवा भवनाची उभारणी केलेली आहे. यामागे मुंबईतील परेल येथील नाना पालकर रुग्णसेवा सदन या धर्तीवर पुण्यातही रुग्ण सेवा देता यावी, हा मुख्य हेतू आहे.इमारत सात मजली असून २७ हजार चौ. फूट बांधकाम केलेले आहे. पुण्याचा विस्तार चहुबाजूंनी झाल्यामुळे ही वास्तू आता शहराच्या मध्यवस्तीत आली आहे. जवळपास परिसरात महत्त्वाची रुग्णालये आहेत.वैद्यकीय उपचारांसाठी पुणे जिल्हा व महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यातून पुण्यात येणार्यांची संख्या मोठी आहे. रुग्णांबरोबर येणारे नातेवाईक, मदतनीस यांची पुण्यात कुठे राहण्याची भोजनाची सोय नसेल, तर त्यांची मोठी अडचण होते.जनकल्याण समितीने प्रामुख्याने पुढील सोई-सेवा देण्याचे नियोजन केले आहे.
जनकल्याण समितीद्वारे देण्यात येणार्या सोईसुविधा
१. ‘डायलिसिस’ची गरज वारंवार किंवा नियमित गरज असणार्या, अनेक रुग्णांना त्या उपचारांचा खर्च करणे आवाक्याबाहेरचे असते. त्यासाठीची प्रतीक्षा यादीसुद्धा मोठी असते. अशांसाठी २० खाटांचे सुसज्ज ‘डायलिसिस’ केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. ज्यातील डॉक्टर, परिचारिका, मदतनीस आदी प्रशिक्षित व मान्यताप्राप्त असतील व उपचारही अत्यल्प दरात होतील.
२. रुग्णांबरोबर येणार्या नातेवाईक मदतनीसांची अत्यल्प दरात भोजन व निवासाची व्यवस्था ‘डायलिसिस सेंटर’च्या वरच्या तीन मजल्यांवर करण्यात येईल.
३. कार्यकर्त्यांना सेवेची प्रेरणा व प्रशिक्षण देण्यासाठी तळमजल्यावर सर्व तांत्रिक सुविधांनी सुसज्ज असे प्रशिक्षण केंद्र होणार असून सेवाभावी संस्था याचा लाभ घेऊ शकतात.
४. जनकल्याण समितीच्या सेवा भवनसह मोठे नऊ प्रकल्प यांचे प्रमुख कार्यालयही या वास्तूत स्थलांतरित होत आहे. डॉ. हेडगेवार सेवा स्मारक निधी व जनकल्याण सेवा फाऊंडेशन यांचीही कार्यालये तेथे असतील.
जनकल्याण समितीने सुवर्ण महोत्सवी वर्षात अनेक सेवाव्रती कार्यकर्त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यापैकी एक सदाशिव अच्युत मालशे यांचाही सेवा भवनच्या उद्घाटन कार्यक्रमात गौरव करण्यात येणार असून समितीच्या ५० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणार्या ‘अहर्निषं सेवामहे’ या ग्रंथाचे प्रकाशन डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार आहे.याप्रसंगी
भारताचीया महारथा या, सारे मिळूनी ओढूया।
पायी गती अन् हाती शक्ती, हृदयी भक्ती जोडूया॥
या गीतपंक्ती स्मरतात. या वेळी जनकल्याण समितीला समाजाप्रति ऋण व्यक्त करताना असेच कार्य पुढे करत राहू, असा विश्वास वाटतो.
(लेखिका जनकल्याण समिती पश्चिम महाराष्ट्र
उपाध्यक्षा आणि जनता सहकारी बँक लि. पुणेच्या उपाध्यक्षा आहेत.)