गद्दारांना गाडण्यासाठी शिवगर्जना यात्रा : संजय राऊत
04-Mar-2023
Total Views | 90
105
मुंबई : शिवगर्जना संपर्क अभियानाच्या निमित्ताने खासदार संजय राऊत हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी साता-यात शाहू कला मंदिर सभागृहात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी लक्ष्मण हाके, जिल्हा प्रमुख सचिन मोहिते, संजय भोसले, हर्षद कदम, बाबुराव माने, हणमंत चवरे, आदींची प्रमुख उपस्थित होते. दरम्यान, राऊतांनी "महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवगर्जना यात्रेला मिळत असलेल्या मोठया प्रतिसादानंतर गद्दारांना गाडण्यासाठी जनता सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. “शिवगर्जना” असे या यात्रेचे नाव आहे, ही गर्जना आमची नसून जनतेची आहे. जनतेच्या मनातील चीड आम्ही पाहात आहोत." असे राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, "४० चोर ज्या पद्धतीने शिवसेनेशी बेइमानी करून पळून गेले. त्यांनी पैशाच्या जोरावर शिवसेना आणि धनुष्यबाण विकत घेण्याचा प्रयत्न केला. त्या चोरांच्या विषयी मी म्हटलं आहे. विधिमंडळ पक्ष तोच त्यांनी पक्ष फोडला. त्यामुळे विधिमंडळ पक्षाची विधिमंडळाची प्रतिष्ठा खालावली." असे राऊत यांनी नमूद केले.
खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारसह पालकमंत्री शंभूराज देसाई त्यांच्यावर जोरदार टीका केली . "मला माफी मागण्याची सवयी नाही, कारण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. शिवसेना संपली म्हणतात तीच शिवसेना आज आम्ही रस्त्यावर पहात आहोत. आता ही शिवसेना धगधगत्या मशालीचे अग्नीकुंड झाले आहे. सध्या शिवसेनेची अवस्था अजिंक्यतारा किल्ल्यासारखी झाली आहे. छातीवर आणि पाठीवर अनेक घाव झेलले आहेत. आता शिवसेना गद्दारीचे घाव झेलत आहे. तरीही आमची शिवसेना टिकून आहे. पण कितीही काही झाले तरी शिवसेनेची बस कधीही रिकामी राहिली नाही. कायम हाऊसफुल राहिली आहे." असं ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांची उद्या खेडमध्ये जाहीर सभा
या सभेच्या तयारीसाठी ठाकरे गट सज्ज झाले आहेत. खेड तालुक्यामधील गोळीबार मैदानात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. 30 हजारहून अधिक कार्यकर्ते या सभेला हजेरी लावण्याचा अंदाज आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर राहतील म्हणूनच गोळीबार मैदानात ही सभा घेण्यात आली आहे. या सभेमध्ये गुहागर मतदारसंघातील बहुसंख्या कार्यकर्ते हे राष्ट्रवादीतून ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजयराव कदम हे देखील याच मेळाव्यात ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.