खानिवडे : पालघर जिल्ह्यातील आदिवासी गरजू महिलांना घर काम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा, त्यांना सन्मानजनक रोजगार प्राप्त व्हावा, या हेतूने ‘सेवा विवेक’ या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. या ‘सेवा विवेक’चे मार्गदर्शक म्हणून धुरा सांभाळणारे ‘हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत रमेश पतंगे यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर पालघर जिल्ह्यात विशेषतः आदिवासी महिलांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे.
नुकतेच महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना ‘पद्म’ पुरस्कार, तर चार मान्यवरांना ‘पद्मश्री’ पुरस्कार राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तसेच, अन्य केंद्रीय मंत्री उपस्थित होते. प्रथम टप्प्यात पार पडलेल्या ‘पद्म’ पुरस्कार समारंभात राज्यातील सहा मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रख्यात उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला आणि सुमन कल्याणपूर यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार, तर, भिकू रामजी इदाते, राकेश राधेश्याम झुनझुनवाला (मरणोत्तर) व्यापार आणि उद्योग, प्रभाकर भानुदास मांडे यांच्यासमवेत रमेश पतंगे यांना साहित्य व शिक्षण क्षेत्रातील कामगिरीसाठी ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘पद्मश्री’ रमेश पतंगे हे ‘सेवा विवेक’ सामाजिक संस्थेचे मार्गदर्शक असून, सामाजिक समरसता मंच, भटके विमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद आणि समरसता अध्ययन केंद्र आणि ‘विवेक’ व्यासपीठ अशा संस्थांचेही ते सहसंस्थापक आहेत. त्यांनी सामाजिक समता आणि देशभक्तीचा प्रचार करणारी ५२ पुस्तके लिहिली आणि प्रकाशित केली आहेत. ‘सेवा विवेक’ सामाजिक संस्थेच्या मार्गदर्शकांचा झालेला देश स्तरावरील गौरव तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याची दखल घेत ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला गौरव यामुळे पालघरमध्ये आनंद होतो आहे.