नवी दिल्ली : काँग्रेस पक्षात नामवंत वकीलांची फौज असूनही राहुल गांधी यांच्या प्रकरणात स्थगिती मिळविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला नाही. त्यामुळे नख कापून हुतात्मा होण्याचा काँग्रेसतर्फे प्रयत्न करण्यात आल्याचा टोला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माडी केंद्री मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शनिवारी पटना येथे लगाविला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेस आणि भाजप पुन्हा आमनेसामने आले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्यावर टिका केली. ते म्हणाले, काँग्रेस पक्षात नामवंत वकीलांची फौज आहे. यापूर्वीदेखील पवन खेडा यांच्या प्रकरणात काँग्रेसने तातडीने स्थगिती प्राप्त केली होती. मात्र, राहुल गांधी यांच्या प्रकरणात जाणीवपूर्वक तसे करण्यात आले नाही. कारण, त्याचा लाभ आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत घेण्याचा प्रयत्न आहे. याद्वारे नख कापून हुतात्मा होण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न असल्याचा टोला रविशंकर प्रसाद यांनी लगाविला.
देशातील ओबीसी समाजाचा राहुल गांधी यांनी अपमान केल्याचा आरोप रविशंकर प्रसादयांनी केला आहे. ते म्हणाले, राहुल गांधी यांना टीका करण्याचा अधिकार आहे, मात्र अपमान करण्याचा अधिकार नाही. राहुल गांधी यांनी जाणीवपूर्वक शिवीगाळ करून देशातील ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. त्यामुळे याविरोधात भाजप देशभरात आंदोलन करणार असल्याचीही घोषणा रविशंकर प्रसाद यांनी केली आहे.