जिव्हाळ्यात भिजलेल्या लता-स्मृती!

    04-Feb-2023
Total Views |
LATA BY Kanekar Shirish


गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन होऊन वर्ष लोटले. अर्थात, लता मंगेशकर यांचा आवाज चिरकाल टिकणारा असल्याने त्यांच्या स्मृती कायमच राहतील, हेही खरे. लेखक शिरीष कणेकर यांना लता मंगेशकर यांचा सहवास लाभला, त्यांच्याशी वार्तालाप करता आला. मुळात कणेकर हे लता यांना आपली आधारदेवता मानतात आणि ‘त्यात आपल्याला लपविण्यासारखे काही वाटत नाही’ असे त्यांनी स्वतःच म्हटले आहे. तेव्हा ते लताविषयी लिहितात तेव्हा त्यात नेहमीच भक्तीकडे वळणारा जिव्हाळा ओतप्रोत भरलेला असतो. ’लता’ याच नावाचे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. कणेकर यांनी लता मंगेशकर यांच्या गाण्याबरोबरच त्यांच्याशी निगडित अनेक पैलूंबद्दल त्यात लिहिले आहे. अर्थात, पुस्तकाच्या सुरुवातीलाच त्यांनी स्पष्ट केले आहे की, हे लता मंगेशकर यांचे चरित्र नाही, तर ही एकमेवाद्वितीय गानकोकिळा आपल्याला कशी दिसली, कशी वाटली, कशी भावली याचे प्रामाणिक कथन प्रस्तुत पुस्तकात आहे. पुस्तकाच्या पानोपानी त्याचा प्रत्यय आल्याखेरीज राहणार नाही.

पुस्तकात १९ लेखवजा प्रकरणे असली तरी पुस्तकातील कोणतेही पान काढून वाचले तरी ते वाचकाला लताबद्दल अनोखी माहिती देईल. अनेक किस्से, आठवणी यांच्या नोंदीतून लेखकाने लताच्या लोभस पैलूंचे दर्शन घडविले आहे. त्यातून लताचे चित्रपट कलाकार, सहगायक आणि गायिका यांच्याशी संबंध कसे होते, याचेही दर्शन घडते. उदाहरणार्थ, ‘एक थी लडकी’ या चित्रपटातील ’लारेलप्पा लारेलप्पा’ हे गाणे गाजले. ते लताबरोबर गायले होते जी. एम. दुराणी या गायकाने. मात्र, त्यानंतर तो लताबरोबर फारसा गायला नाही. याबद्दल लताने कणेकर यांना सांगितले होते, “तो आगाऊ होता; कुचेष्टेखोर होता. माझ्या बाबांनी दिलेली एक माळ शुभदायक म्हणून मी घालून जायची; तिच्यावरून तो मला डिवचयाचा.. ही कसली फालतू माळ.. लताच्या गळ्यात हिर्‍याचा कंठ हवा. मला त्याचे बोलणे रुचले नाही.. मी त्याच्याबरोबर गाणेच सोडून दिले...” लता मंगेशकर यांचा स्पष्टवक्तेपणा सर्वश्रुत होता आणि त्यामुळे काही मिथ्य कथाही तयार होत असत.

कणेकर यांनी अशीच एक घटना विशद केली आहे. अमेरिकेत लॉस एंजलिस येथे ते ज्या घरी उतरले होते, त्या घरच्या गृहिणीने कणेकर यांना सांगितले- ’‘लताचा कर्यक्रम इथेच झाला. माझी एक जवळची मैत्रीण लताचा उपवास म्हणून तुपातली साबुदाण्याची खिचडी घेऊन गेली, तर लताने मी असले काही खात नाही म्हणून बशी भिरकावून दिली.” कणेकर म्हटले, “मला हे खरे वाटत नाही. पण, मुंबईला परतल्यावर मी लताच्या कानावर घालेन.” मुंबईला आल्यावर कणेकर यांनी त्या प्रसंगाबद्दल लताला विचारले. लता मंगेशकर यांची प्रतिक्रिया होती, ‘’मी अन्नाचा अपमान केला? हे शक्य तरी आहे का?” कणेकर यांनी अमेरिकेतील त्या महिलेला फोन करून सांगितले, “माफ करा, पण तुमच्या मैत्रिणीपेक्षा माझा लतावर जास्त विश्वास आहे.” हाच धागा पकडून कणेकर अन्यत्र लिहितात, “लता म्हणाली, माझे खाण्याचे काहीही चोचले नाहीत...” आणि पुढे ते लिहितात, “सगळ्या (मंगेशकर) बहिणींच्या जिभांना भारी चव आहे. लता माझ्याकडे कोळंबीची खिचडी आणि खिमा पॅटिस खाऊन गेली..”

लता मंगेशकर पार्श्वगायनाच्या क्षेत्रात नवख्या होत्या. तेव्हा, अनिल विश्वास यांनी त्यांचा परिचय दिलीप कुमार यांच्याशी करून दिला. ’मराठी?’ दिलीप कुमारने विचारले. लता यांनी ‘हो’ असे उत्तर दिले. तेव्हा दिलीप कुमारची प्रतिक्रिया होती,‘’इन लोगों कि जबान से दाल चावलं कि बु आती हैं.” लताला ते झोंबले. त्यांनी उर्दूचा अभ्यास करण्यासाठी एका मौलवींची शिकवणी लावली. अर्थात, पुढे दिलीप कुमार यांच्याशी लता यांचे घनिष्ट संबंध जडले. लंडनच्या अल्बर्ट हॉलमध्ये लता यांच्या कार्यक्रमात दिलीप कुमार यांचे निवेदन तितकेच गाजले होते. दिलीप कुमार यांच्या अखेरच्या आजारपणात ते माणसेही ओळखत नसत. लता त्यांना भेटायला गेल्या होत्या. सायरा बानू दिलीपकुमार यांना सूप देत होत्या; पण दिलीपकुमार ते घेत नव्हते. तेव्हा लता यांनी तेच सूप दिले आणि दिलीप कुमार यांनी ते सूप घेतले. ’कुठे अंतरीची खूण पटली असेल का?’ असा प्रश्न लतालाही पडला, असे लेखकाने लिहिले आहे. कोणत्या नायिकेबरोबर तुमचे मैत्रीपूर्ण संबंध होते, असे एकदा कणेकर यांनी लताला विचारले. तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “मीना कुमारी.. भारी गोड आणि लाघवी स्वभाव होता...” मुकेशला तर लता भाऊच मानत असत.

तोच मुकेश एकदा कुठेसा बोलताना म्हणाला होता, “पता हैं? लता मंगेशकर को इतनी महान गायिका क्यू मानते हैं? क्यू कि वो मुझ जैसे बेसुरे के साथ भी सूर में गाती हैं...” अशी अनोखी आठवण लेखकाने नमूद केली आहे. ‘संगीतकारांच्या चालीत मी सहसा ढवळाढवळ केलेली नाही. नौशाद किंवा सज्जादसारख्या संगीतकारांनी ते खपवूनही घेतले नसते... ज्या संगीतकारांना मी केलेले माफक बदल रुचत असत, तेथे मी लुडबुड करीत असे... पण, त्याची जाहीर वाच्यता करणे, हा त्या संगीतकारांचा अवमान केल्यासारखे होईल.. मी तो कदापि करणार नाह,” असे लता यांचे उद्गारही लेखकाने नोंदविले आहेत. लताच्या सडेतोडपणाचीही उदाहरणे पुस्तकात सापडतील. एक तरुण बंगाली गायिका प्रतिलता म्हणून उदयास येत होती आणि ती लताला भेटायला आली. “मी तुमची धुणीभांडीही करायला तयार आहे,” असे म्हणाली. तेव्हा लता त्यांना म्हणाल्या, ’‘धुणीभांडी कशाला करतेस? त्यापेक्षा गाणी म्हण. धुणीभांडी करून तू लता मंगेशकर होणार नाहीस.. गाणी गाऊन होशील!”

लता यांच्या नर्मविनोदी स्वभावाचेही दाखले लेखकाने दिले आहेत; तेही वाचनीय. पुस्तकात लेखांचे संकलन करण्यात आले आहे. मुद्द्यांची पुनरुक्ती लेखांत चालू शकते, कारण ते वेगवेगळ्या वेळी लिहिलेले असतात. मात्र, लेखांचे संकलन करताना झालेली पुनरुक्ती मात्र खटकते.पुस्तकात लेखकाने दिलेली एक आठवण मार्मिक आहे. लेखक लिहितो, “एका कोजागिरीच्या दुसर्‍या दिवशी लताने मला फोन केला. तिने मला विचारले काय केलंत काल कोजागिरीला? ’तुमची गाणी ऐकली’, मी खरं ते सांगितलं. ’मजा आहे तुमची’ लता चिवचिवली.’ मात्र, लता मंगेशकर जे म्हटल्या ते खरेच होते. लताच्या सुरांनी श्रोत्यांना वर्षानुवर्षे मजा आणली आणि तो अनुभव ते सूर यापुढेही देणार आहेत. प्रस्तुत पुस्तक म्हणजे जिव्हाळ्यात भिजलेल्या लता-स्मृती आहेत, असेच त्याचे वर्णन करावे लागेल.


पुस्तकाचे नाव : लता
 
लेखक : शिरीष कणेकर

प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन, मुंबई

पृष्ठसंख्या : १८०
 
मूल्य : रुपये ३२०



-राहूल गोखले


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121