नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज (रविवारी) बिहार मधील पाटणा येथे २६ वी पूर्व विभागीय परिषदेची बैठक होणार आहे. या पूर्व विभागीय परिषदेमध्ये बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंड या राज्यांचा समावेश आहे.
बैठक भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आंतर राज्य परिषद सचिवालय आणि बिहार सरकारच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. या पूर्व विभागीय परिषदेच्या 26 व्या बैठकीला सदस्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह, प्रत्येक राज्यातले दोन वरिष्ठ मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर या बैठकीत राज्य सरकारांचे मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी तसेच केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी होणार आहेत.
राज्यांनी प्रस्तावित केलेले मुद्दे प्रथम संबंधित प्रादेशिक परिषदेच्या स्थायी समितीसमोर चर्चेसाठी मांडले जातात. जे मुद्दे परस्पर संमतीने सोडवता येत नाहीत ते प्रादेशिक परिषदेच्या बैठकीत चर्चेसाठी मांडले जातात. प्रादेशिक परिषदेच्या प्रत्येक बैठकीत राष्ट्रीय महत्त्वाच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा होत असते. यामध्ये महिला आणि लहान मुलांवरील बलात्कार प्रकरणांचा जलद तपास आणि निपटारा करण्यासाठी जलदगती विशेष न्यायालयांची अंमलबजावणी, प्रत्येक गावाच्या 5 किमीच्या आत बँका/इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या शाखांची सुविधा, दोन लाख नवीन प्राथमिक कृषी कर्जाची निर्मिती यांचा समावेश आहे.