मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढसाठी भाजपकडून निरिक्षकांची घोषणा
मुख्यमंत्री पदांचा निर्णय लवकरच होणार
08-Dec-2023
Total Views | 57
नवी दिल्ली : भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील निरीक्षकांची नावे जाहीर केली आहेत. हे निरीक्षक प्रत्येक राज्यातील आमदारांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करतील.भाजपच्या संसदीय मंडळाने राजस्थानसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची निरिक्षक म्हणून घोषणा केली आहे. त्यांच्यासोबत राज्यसभा सदस्य सरोज पांडे आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याही नावांची घोषणा करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे मध्य प्रदेशसाठी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, भाजप ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. के. लक्ष्मण आणि राष्ट्रीय चिटणीस आशा लाकडा यांच्या नावांची घोषणा केली आहे. तसेच छत्तीसगढसाठी केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा, केंद्रीय जलमार्ग, बंदरे आणि आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल व राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम यांची घोषणा केली आहे.
नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीसाठी तीन राज्यांचे निरीक्षक संबंधित राज्यांमध्ये जातील आणि तेथे मुख्यमंत्र्यांच्या नावांची घोषणा केली जाईल. मुख्यमंत्रिपदाच्या निवडीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून तीन मुख्यमंत्र्यांची निवड करताना पक्ष सामाजिक, प्रादेशिक, प्रशासन आणि संघटनात्मक हित लक्षात घेतले जाणार असल्याचे भाजपतर्फे सांगण्यात आले आहे.