गानसूर्य भास्करबुवा बखले यांच्या स्मरणार्थ दि. १० जुलै, १९२६ कल्याणमध्ये ‘कल्याण गायन समाज’ या संस्थेची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत सूरप्रेमींचे हक्काचे स्थान म्हणून ‘कल्याण गायन समाज’ची ओळख आहे. आज ९७ वर्षे पूर्ण होत असताना आपले स्थान गायन समाजाने जपले आहे. ‘कल्याण गायन समाजा’च्या सुरेल कारकिर्दीचा या लेखात मागोवा घेतला आहे.
सुरांची भुरळ, सुश्राव्य गायनाची भुरळ पडणार नाही, असा माणूस विरळाच. कल्याणमध्ये सुरप्रेमी काही कमी नाहीत. कल्याणमध्ये ही ‘सुरसाधना कल्याण गायन समाज’ करत आहे. कार्यक्रमांचे उत्तम आयोजन, चांगल्या कलाकारांची निवड आणि या कार्यक्रमाला लाभलेला रसिक श्रोतेवर्ग यामुळे आजही गायन समाजाकडे कलाकारांची पाऊले आपसुकच वळतात. पण संस्थेची उभारणी आणि कार्यवाही सोपी मुळीच नव्हती.
दिनकर रघुनाथ तथा काकासाहेब बर्वे यांच्या पुढाकाराने गायन समाजाची स्थापनाकरण्यात आली. सुरुवातीची काही वर्षे संस्थेला आपला कारभार भाड्याच्या जागेतूनकरावा लागला. पुढे शहरातील एक धनिक बाळासाहेब फडके यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे असलेली टिळक चौकातील जागा संस्थेला केवळ ९०० रुपयांमध्ये उपलब्ध करून दिली. त्या जागेलगतच असणारा पालिकेच्या मालकीचा भूखंडही संस्थेला मिळाला. इमारतीचा आवाका लक्षात घेता पाऊण लाख रुपये खर्च येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, सर्वांनीच नि:स्वार्थी वृत्तीने योगदान दिल्याने अवघ्या २१ हजार रुपयांमध्ये संस्थेची वास्तू उभी राहिली.
संस्थेच्या या जुन्या वास्तूतील नेने-रानडे सभागृह देशातील नामवंत गायक-वादकांच्या संगीत आविष्काराचे साक्षीदार ठरले. साधारण २५० ते ३०० रसिक क्षमतेच्या या सभागृहात त्या वेळच्या प्रथेप्रमाणे महिला प्रेक्षकांसाठी स्वतंत्र गॅलरी होती. इमारतीच्या उभारणीसाठी देय असलेले आठ हजार रुपये फेडण्यासाठी संस्थेच्या सभासदांनी ‘सं. सौभद्र’, ‘सं. मानापमान’ आणि ‘सं. एकच प्याला’ या तीन नाटकांचे प्रयोग सादर केले. त्यातून काही प्रमाणात निधी जमा झाला. स्वतंत्र घटना, नियमावली तयार करून १९५४ मध्ये ही संस्था नोंदणीकृत झाली. त्याआधीच १९५१ मध्ये संस्थेने रौप्यमहोत्सवी टप्पा गाठला. यानिमित्ताने विशेष समारंभ साजरा करण्यात आला. या पहिल्या पंचविशीतच संस्थेने १५५ कलावंतांचे कार्यक्रम आयोजित केले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कलाकार येऊनसुद्धा त्यावेळी सर्व कलाकारांचे नियोजन गायन समाजद्वारे व्यवस्थित केले गेले. १९७६ मध्ये संस्थेने सुवर्णमहोत्सवी टप्पा गाठला. सुप्रसिद्ध चित्रकार नेत्रा साठे यांनी भास्करबुवांचे तैलचित्र संस्थेस भेट म्हणून दिले. सुप्रसिद्ध लेखक पु.ल. देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून या सोहळ्यास उपस्थित होते. पुलंनी यावेळी बोलताना त्यांच्या खास शैलीत संस्थेची प्रशंसा केली. संगीतकलेचा प्रसार करणारी ‘कल्याण गायन समाज’ ही केवळ राज्यातीलच नव्हे, तर देशातील प्रमुख संस्था असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. संस्थेला वैयक्तिक हितापेक्षा संस्थेचे हित मोठे मानणारे कार्यकर्ते लाभतात, तेव्हा संस्था फोफावते. उलट संस्थेपेक्षा स्वत:ला मोठे मानणारे कार्यकर्ते असले की संस्थेची अधोगती सुरू होते, असे सांगून त्यांनी संस्थापक काकासाहेब बर्वेच्या नि:स्पृह वृत्तीचे गौरव केला.
त्यानंतर १९८६ मध्ये हीरक महोत्सव, सहस्त्रचंद्र दर्शन तसेच २००१ मध्ये संस्थेचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला गेला. १३:४२, दि. २६ डिसेंबर रोजी अमृत महोत्सव साजरा केल्यानंतर संस्थेने गानसूर्य भास्करबुवा बखले यांच्या स्मरणार्थ २००२ पासून देवगंधर्व महोत्सव आयोजित करण्यास सुरुवात केली. गेल्या २० वर्षांत या महोत्सवाने उत्तमोत्तम कार्यक्रम सादर करून देशभरातील संगीतप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. यापूर्वी कल्याण-डोंबिवली परिसरात एकही संगीत महोत्सव होत नव्हता. देवगंधर्वने ती उणीव भरून काढली आहे. उस्ताद झाकीर हुसैन, पंडित शिवकुमार शर्मा, हरीप्रसाद चौरासिया, पंडित जसराज यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांचे देवगंधर्वच्या माध्यमातून झालेले सादरीकरण आजही कल्याणकर रसिकांच्या लक्षात आहे.
संस्थेने संगीत शिक्षण देण्याच्या हेतूने १९४६ साली सुरू केलेले दिनकर संगीत विद्यालय आजही जवळ जवळ ४०० विद्यार्थ्यांना शास्त्रीय गायन, तबला, हार्मोनियम, बासरी, कथक भरतनाट्यम इत्यादीचे शास्त्रोक्त शिक्षण देत आहे. काळाच्या ओघात जुनी वास्तू जीर्ण झाल्याने संस्थेच्या सभासदांनी बहुमताने त्या जागी नवी इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता टिळक चौकात संस्थेची चार मजली भव्य देखणी वास्तू उभी राहिली आहे. त्यासाठी कोणत्याही स्वरूपाची शासकीय मदत घेण्यात आलेली नाही हे विशेष.
‘म्हैसकर फाऊंडेशन’चे डी. पी. म्हैसकर तसेच एल अँड टीचे यशवंत देवस्थळी यांच्यासारख्या दानशूर व्यक्तींमुळे नवीन वास्तू आकारास येऊ शकली. या नव्या इमारतीत हार्मोनियम, गायन आणि तबला शिक्षणासाठी स्वतंत्र कक्ष आहेत. २०० प्रेक्षक क्षमतेचे सुसज्ज वातानुकूलित सभागृह आहे. त्यात कथ्थक भरतनाट्यमचे वर्गही भरतात. संस्थेच्या नव्या वास्तूत एक अद्ययावत ध्वनिमुद्रण कक्ष उभारण्यात येणार असून कलावंतांना तो वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
संस्थेच्या वाचनालयात सध्या संगीतविषयक तब्बल ८०० पुस्तके असून त्याबरोबरच १९८२ पासून झालेल्या सर्व संगीत मैफिलींचे ध्वनिमुद्रण उपलब्ध आहे. नव्या पिढीतील संगीत अभ्यासकांना त्याचा उपयोग होणार आहे. कलाशिक्षण सर्वांना उपलब्ध व्हावे, या हेतूने कल्याणमध्ये एक कला महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने गायन समाजाच्या पदाधिकार्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या माध्यमातून सर्वांपर्यंत संगीत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कार्यकारणीचा पारदर्शक कारभार, सर्वांची सांघिक कामगिरी आणि या सगळ्यांना मिळणारे रसिकांचे पाठबळ यामुळे ‘कल्याण गायन समाज’ भक्कम उभा आहे आणि या प्रवासाला कुठलाही अंत नसून अविरत संगीत सेवा गायन समाज सुरूच ठेवणार यात कुठलीच शंका नाही. ‘कल्याण गायन समाज’च्या माध्यमातून आत्तापर्यंत सांस्कृतिक वारसा आम्ही जपला आहे. यापुढेही रसिकांसाठी उत्तम मिनी थिएटर, संगीत अध्यापन केंद्र, कलादालन अशा अत्याधुनिक सुविधा राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. चांगल्या सुविधा संगीतप्रेमीना देऊन सांस्कृतिक वैभव आम्ही जतन करणार आहोत. ९७ वर्षांची परंपरा असलेल्या संस्थेचा सदस्य असल्याने समाधान वाटते.
प्रशांत दांडेकर