विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म।
भेदाभेद भ्रम अमंगळ॥
अवघ्या संत परंपरेने महाराष्ट्राला अवघे जग विष्णुमय आहे. भेदाभेद करणे अमंगल आहे, असा उपदेश केला. आज मात्र हाच भेदाभेद करून लढणार्या महाराष्ट्रातील जातीपातींना आणि त्यांनी आपापसात लढावे म्हणून आगीत तेल ओतणार्या स्वार्थी समाजकंटकांना पाहताना, पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण प्रकर्षाने जाणवते आणि ही राजकीय परिस्थिती पाहता एक राष्ट्राचा शिल्पकार म्हणून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची सामाजिक समरसता आपल्या सर्वांसमोर या लेखनातून ठेवावी म्हणून हा प्रपंच.
महाराजांचं वेगळेपण हेच आहे की, त्यांनी आपल्या सहकार्यांना, सैनिकांना, कर्मचार्यांना, रयतेला अशा प्रकारची प्रेरणा दिली की, ते स्वराज्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करण्यास तयार झाले. अगदी याची सुरुवात आपल्याला बाल शिवबांनी रायरेश्वर मंदिराच्या गाभार्यात आपल्या सवंगड्यांसह हिंदवी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतानापासून, जावळीचे मोरे यांचा बंदोबस्त, अफजलखानाचा वध, पन्हाळ्याचा वेढा, गाजापूरची खिंड, शाहिस्तेखानाची फजिती, मुरारबाजींचा पराक्रम, पुरंदरचा तह, आग्य्राहून सुटका, राज्याभिषेक सोहळा, दक्षिण दिग्विजय मोहीम अशा तुम्हा आम्हा सर्वांना माहीत असलेल्या अनेक घटनांमध्ये ती प्रेरणा आपणास दिसते. या प्रेरणेचे वैशिष्ट्य हे आहे की, महाराजांच्या मृत्यूनंतरसुद्धा दिल्लीचा मुघल बादशहा औरंगजेब आपल्या पाच लाख सैन्यांसह स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी महाराष्ट्रात ठाण मांडून बसला होता. २७ वर्षे मराठे झुंजत होते. पण, औरंगजेबाला यश मिळाले नाही.
आज एक शिक्षक म्हणून मला पडणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, अशी ती कोणती प्रेरणा होती की, ज्यामुळे सर्व समाज महाराजांच्या पाठीशी उभा राहिला? त्या प्रेरणेचा शोध घेण्याची आवश्यकता वाटते; कारण समाज तोच आहे. पण, शिवरायांच्या कालखंडातील समाजातील अनेक घटकांनी स्वराज्याप्रति दाखवलेली निष्ठा, शिवरायांपूर्वी किंवा त्या नंतरच्या त्याच समाजातील काही घटकांनी स्वराष्ट्राप्रति दाखवली नाही. स्वतःच्या राष्ट्राप्रति असलेली निष्ठा ही इतकी कशी काय बदलू शकते?
आजचे आपले चित्र काय? आपण आपली प्रेरणास्थानेच विभागून टाकलेली दिसतात. ज्या छत्रपती शिवरायांनी सर्व समाजघटकांना प्रेरणा दिली, त्या प्रेरणेने मोठ्या प्रमाणात समाज एकत्र गुण्यागोविंदाने राहिला व स्वराज्य निर्मितीच्या कार्यात गुंफला गेला. अगदी अखंड राष्ट्राला माहीत असलेले महाराजांसोबतचे मावळे मग त्यात जीवा महाला, शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, तानाजी मालुसरे, मदारी मेहतर, फिरंगोजी नरसाळा, प्रतापराव गुजर, हिरोजी फर्जंद, रघुनाथ पंत हनुमंते, बहिर्जी नाईक अशी ही रत्ने वेगवेगळ्या जाती-धर्माची होती. स्वराज्यात कधीही जाती-धर्माच्या नावाने वाद-तंटे आपल्याला दिसून येत नाहीत. त्या छत्रपतींना आपण मराठ्यांचे किंवा हिंदुत्ववाद्यांचे नेते म्हणून संकुचित करून ठेवले. भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक विषमतेच्या प्रचंड यातना स्वतः सहन करूनसुद्धा संपूर्ण देशाला प्रज्ञा, प्रेम, समता, बंधुता, करुणेचाच वारसा दिला.
राज्यघटनेचाही वारसा दिला व हिंदू कोड बिलाचाही वारसा दिला. त्याच बाबासाहेबांना आपण दलितांचे नेते म्हणून संकुचित करून ठेवले. ज्या महात्मा फुलेंनी सामाजिक समरसता व्हावी म्हणून आपले आयुष्य वेचले, मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, त्यांना आपण केवळ माळी समाजाचे नेते म्हणून संकुचित केले, तर ’भारतीय असंतोषाचे जनक’ म्हणून ज्या लोकमान्य टिळकांना इतिहासाने गौरवले त्यांना फक्त चितपावन ब्राह्मणांचे नेते म्हणून संकुचित केले. राष्ट्रपिता महात्मा गांधींना तर फक्त कार्यालयातील भिंतीवर फोटोच्या रुपात ठेवले. राष्ट्रपुरुषांप्रति आमच्या मनातील ही भावना आम्हाला आज ज्या वळणावर घेऊन आली आहे, त्याचाही खर्या अर्थाने अभ्यास करण्याची गरज आहे. आम्ही राष्ट्रपुरुषांची ओळखसुद्धा विविध रंगांनी करून ठेवली. कोणी भगवे, निळे, हिरवे, लाल. या रंगांवरूनसुद्धा आमच्यात दुरावा, भांडणं, द्वेष, मत्सर. कधी मिळणार आम्हाला आमची खरी प्रेरणास्थाने??
याशिवाय माझ्या मते, जाज्ज्वल्य राष्ट्रभिमानाची प्रेरणा नष्ट होण्यामध्ये ज्या अनेक गोष्टी कारणीभूत आहेत, त्यामध्ये ब्रिटिशांनी या देशावर लादलेली व राबवलेली कारकून बनवणारी शिक्षण व्यवस्था व प्रशासन व्यवस्था, की ज्याचे आजही आपण कमी अधिक प्रमाणात गुलाम आहोत, यासोबतच त्या आधीच्या कालखंडामध्ये झालेली परकीय आक्रमणे, त्यांनीही राबवलेली प्रशासन व्यवस्था या सगळ्यांचा परिपाक आज जाज्ज्वल्य राष्ट्राभिमान, देशाभिमान निर्माण होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे येथील काही नागरिकांमध्ये देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करण्याच्या भावनेचा अभाव दिसून येतो. आज प्रत्येक भारतीयाने आपण निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला, तरी देश आत्मनिर्भर व विकसित राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही, यात यत्किंचितही शंका नाही. पण, इथे अनेकांचा दृष्टिकोन झारीतील शुक्राचार्यांचा दिसतो.
दिवसागणिक जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा या नावाने संकुचित होताना दिसत आहे आणि त्याही पलीकडे जाऊन वैयक्तिक स्वातंत्र्याच्या व स्वार्थाच्या भावनेने स्वैराचार बोकाळत चालला आहे. सामाजिक समरसता वाढण्याऐवजी तिच्या विभाजनाकडे आपला प्रवास सुरू असल्याचे चित्र नाही म्हटले तरी दिसायला लागले. आजची आपली वास्तव गरज ओळखून वर्तन करणे आपल्याला नाहीच जमत. महाराजांनी शेतकर्यांना पेरणीसाठी धान्य, नांगर, बैल उपलब्ध करून दिले. स्वराज्यातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणली. त्यामुळे उत्पादन अनेक पटीने वाढले. शेतात तयार झालेल्या मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठा निर्माण केल्या. त्यासाठी व्यापारी वर्गही निर्माण केला. कधीही वतने, जहागिरी दिली नाहीत. प्रत्येकाला काम उपलब्ध करून दिले व योग्य काम करणार्या व्यक्तीचा योग्य गौरवही केला. त्याची अनेक उदाहरणे आपल्याला शिवचरित्रात मिळतात. थोडक्यात, महाराजांनी जे प्रजाहित दक्षतेचे धोरण राबवले, त्याचा आज विचार करण्याची आवश्यकता आहे.
अगदी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा चीनने आपल्यावर आक्रमण केले व आपला बराच मोठा भूप्रदेश गिळंकृत केला. या उलट पाकिस्तानचा आपण चार वेळेला युद्धात पराभव केला. पण, सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीनसुद्धा आपल्याला मिळाली नाही किंवा मिळवता आली नाही. थोडक्यात, आपण पाकिस्तानला चार वेळेला युद्धात हरवलं; पण तहात आपण हरलो. या प्रत्येक वेळी माझ्या मनाला सारखे वाटत राहते, आपण छत्रपतींच्या विचारांनाच विसरलो. कारण, छत्रपतींनी जेवढे तह केले, त्या प्रत्येक तहामध्ये आपलं कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये, याची काळजी घेतली. अगदी सखोल अभ्यास केला, तर मिर्झाराजा जयसिंगाशी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केलेला पुरंदरचा तहसुद्धा अनेक दृष्टिकोनातून महाराजांच्या हिताचाच होता. इतिहास आपल्याला पुनःपुन्हा हेही सांगतो की, परक्यांनी आपल्यावर विजय मिळवल्यानंतर त्यांनी आपली श्रद्धेय स्थानं व स्फूर्ती देणारी प्रतीके शक्य तेवढी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आपण मात्र विजय मिळवल्यानंतर अशा प्रकारे शत्रूची श्रद्धास्थानं किंवा प्रेरणा देणारी प्रतीके नष्ट केल्याची उदाहरणे दिसत नाही. याउलट आपण आक्रमणकारी प्रवृत्तींच्या श्रद्धा स्थानांची किंवा त्यांच्या स्फूर्ती स्थानांची जपणूक उत्तम प्रकारे करताना दिसतो.
ज्या शिवाजी महाराजांनी आपल्या लोकोत्तर गुणांनी राज्य मिळवले, ते राज्य चिरकाल का टिकले नाही, याचे कारण हेच असावे की, त्या राज्याचा अभिमान सर्वांनासारखाच नव्हता किंवा शासनकर्तेसुद्धा महाराजांच्या विचारांना विसरलेले दिसत होते. स्वतः छत्रपती राजश्री शाहू महाराजांनीसुद्धा सामाजिक समरसता वाढावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवण्यास सांगितला. महाराजांच्या काळात ज्या प्रकारे अठरापगड समाज एकत्र गुण्यागोविंदाने राहत होता, आज त्याचा स्वीकार करण्याची खर्या अर्थाने गरज आहे. केव्हातरी जात, धर्म विरहित समाज रचना निर्माण करण्याकडे आपल्याला वळावेच लागेल. तसे न झाल्यास काय दिवस उगवेल, याची कल्पनाच न केलेली बरी. महाराजांचा याही दृष्टीने विचार व्हावा; अन्यथा शिवा काशिद, मुरारबाची देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, फिरंगोजी नरसाळा, इब्राहिम खान, जिवा महाला, मदारी मेहतर, प्रतापराव गुजर, बहिर्जी नाईक अशा असंख्य नरवीरांनी स्वराज्यासाठी आपले तन-मन-धन ज्या विचाराने बहाल केले होते की, तो विचार जात-धर्मापलीकडचा होता. त्या विचारांचे आज देशहितासाठी पुनर्जीवन करण्याची आवश्यकता आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा प्रकृती विरुद्ध विकृती, स्वातंत्र्य विरुद्ध गुलामी, निरपेक्ष धर्मनिष्ठा विरुद्ध विकृत धर्मांधता असा होता. समरस समाज निर्माण होण्यास उज्ज्वल चारित्र्य असणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आहेत. प्रकृती, स्वातंत्र्य व निरपेक्ष धर्मनिष्ठा या मूल्यांसाठी आजही जे उभे आहेत, ते खरे शिवभक्त. विकृतीच्या बाजूचे लाचार, गुलाम आणि विकृत धर्मांध हे शिवद्रोही! निरपेक्ष धर्मनिष्ठा म्हणजे प्रत्येकास ’स्व’धर्म पालनाचे पूर्ण स्वातंत्र्य. मात्र, अन्य धर्मियांचा छळ करणार्या विकृतीला तलवारीचा तडाखा देण्याचे सामर्थ्य!
आज तुम्ही आम्ही सर्वांनी आपण निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम काम करणे, हाच एक शिवरायांचा मावळा म्हणून त्यांना केलेला मानाचा मुजरा असेल. त्या माध्यमातून देशाचेही भविष्य उज्ज्वल करण्यासाठीच्या महासागररुपी कार्यात आपल्यामुळे एका थेंबाची निश्चितच भर पडेल. अशा असंख्य थेंबानी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात केलेल्या सर्वोत्तम कामगिरीमुळेच हा भारत देश उद्या आत्मनिर्भर होऊन जगात विश्वगुरू होईल, यात शंकाच नाही. कर्तव्यदक्ष माणसांमधूनच कामाला शिस्त येईल. प्रत्येकाने देशासाठी एकच केले पाहिजे, जे महात्मा गांधीजी म्हणत की, ’देशाच्या विकासासाठी जो बदल व्हावा असे तुम्हाला मनापासून वाटते, सर्वप्रथम तो बदल स्वतःमध्ये करा’ आधी प्रत्येकाने आपल्या मनाच्या आत जडलेल्या जातीपाती संपवाव्यात. कारण, हा देश पारतंत्र्यात जाण्यास त्याच गोष्टी कारणीभूत ठरलेल्या आहेत. कुठेही पचापचा थुंकू नये, सिग्नल स्वतः पाळावेत, कर वेळेत भरावेत यांसारख्या साध्या वाटणार्या गोष्टी आपण नाही केल्या तर काहीच होणार नाही. ’मी माझे कर्तव्य नीट करणार आहे,’ असे वर्तन करणारी जी थोडी माणसे या देशात आहेत, तीच देशाचे भवितव्य घडवतील, यावर माझा ठाम विश्वास आहे. एक भारतमातेचा पुत्र म्हणून, एक राष्ट्राभिमानी शिक्षक म्हणून मी माझ्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ’सामाजिक समरसता आणि छत्रपती शिवराय’ हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रा. प्रशांत शिरुडे