काही दिवसांपूर्वी एक बातमी झळकली की, जगातले आठवे आश्चर्य हा मान आता कंबोडियातल्या अंगकोर वाटला मिळाला आहे. वास्तविक जागतिक पातळीवर अशी घोषणा करणारी कोणतीही अधिकृत समिती वा संघटना नाही. अगदी इसवी सन पूर्व काळात ग्रीक लोकांनी सात प्रेक्षणीय वास्तूंची नोंद घोषित केली होती. तेव्हापासून अधूनमधून अशा क्रमवारी जाहीर केल्या जातात. 2007 मध्ये 100 दशलक्ष लोकांची मते मागवून 7-7-2007 या जादुई तारखेला सात नवी आश्चर्ये जाहीर केली गेली. चिचेन इत्झा (मेक्सिको), कोलोझियम (इटली), येशूचा पुतळा (ब्राझील), चीनची मोठी भिंत, माचूपिचू (पेरू), पेत्रा (जॉर्डन) आणि ताजमहाल (भारत). यापुढचे क्रमांक बदलत राहतात. आता आठव्या क्रमांकावर इटलीच्या पॉम्पेईऐवजी अंगकोर वाट झळकले आहे. मतदानाच्या पद्धतीबाबत अनेक प्रश्नचिन्हे असल्याने ‘युनेस्को’ क्रमवारीपासून दूरच आहे. काहीही असो, या निमित्ताने अंगकोर वाट पुन्हा झोतात आले, हे खरे.
1992 मध्ये ’युनेस्को’ने जागतिक वारसा स्थळांमध्ये अंगकोर वाटचा समावेश केला आणि 1993 मध्ये साडेसात हजार पर्यटकांनी भेट दिली. ही संख्या वाढून 2007 मध्ये दहा लाख, तर 2018 मध्ये 25 लाखांपुढे गेली. ’कोरोना’ काळातील बंधनांमुळे प्रवासच बंद झाला. पण, हळूहळू सर्व पूर्वपदावर येत असताना, यावर्षी पहिल्या सहा महिन्यांत चार लाख पर्यटकांची तिथे नोंद झाली आहे आणि आताच्या बातमीमुळे हा आकडा निश्चितच वाढेल, यात शंका नाही.
अंगकोर वाट म्हणजे असे आहे, तरी काय एवढे? असा प्रश्न अनेकांना पडणे अगदी साहजिकच. ’अंगकोर’ म्हणजे ’नगर’(नगर-नोकोर-अंगकोर) आणि ’वाट’ म्हणजे ’वास्तू,’ ’मंदिर.’ हे नगरमंदिर जगातले सर्वात मोठे विष्णू मंदिर आहे. एक-दोन नव्हे, तब्बल 402 एकर परिसरात विस्तीर्ण पसरलेले. प्राचीन भारतीयांच्या विश्वाच्या संकल्पनेवर आधारित याची रचना. काल्पनिक अथांग पाणी, त्यात पृथ्वी, तिच्या मधोमध मेरू पर्वत, त्यावर पाच शिखरे आणि मधल्या सर्वोच्च शिखरावर देव, अशी ही खोल रुजलेली संकल्पना! ती जशीच्या तशी मंदिर निर्मितीसाठी वापरली गेली. भोवताली मोठे खंदक, आत तटबंद्या, छोट्या पायर्यांनी चढत जाणारे टप्पे, मंदिर, त्यावर पाच शिखरे, मधले शिखर सर्वात उंच आणि आत गाभार्यात विष्णुमूर्ती. याचे जुने नाव ’विष्णुलोक’ होते, असे मानले जाते. म्हणजे सामान्य जगाच्या पातळीवरून चढत-चढत अखेर स्वर्गस्थ देवापर्यंत जाऊन पोहोचायचे. राजा सूर्यवर्मन (दुसरा) याने 12व्या शतकात हे बांधले. त्यापूर्वीचे राजे शिवभक्त असल्याने शिवमंदिरे निर्माण केली गेली. पण, याने मात्र भव्य विष्णू मंदिर उभारले.
मग पुढचा प्रश्न असा की, भारताबाहेर कंबोडियात अशी देवालये कशी काय? तर शिलालेखांतून, प्रवाशांच्या वर्णनातून काही गोष्टी उलगडल्या. प्राचीन काळापासून भारताचा इतर देशांशी व्यापार सुरू होताच. जसा रोमशी तसा आग्नेयेकडेही. चोळ राजवटीत तर उत्तम नौका बांधून, सागरी मार्गाने व्यापार चालत असे. व्यापाराबरोबर सांस्कृतिक देवाणघेवाणही अर्थातच होत असे. कौंडिण्य नावाचा ब्राह्मण असाच नावेतून कंबुजदेशात (कंबोडिया) आला. इथल्या सोमा या नागवंशी राजकन्येशी विवाह करून इथेच स्थायिक झाला. शेती, वस्त्रनिर्मिती या गोष्टी त्यानेच इथल्या ख्मेर लोकांना शिकवल्या. त्याबरोबरच देव, देवालये, स्वर्ग, नरक अशा संकल्पनाही लोकांना समजल्या. पूर्वेच्या चाम लोकांशी (चंपा किंवा आताचे व्हिएतनाम) सतत संघर्ष होत असे. आठव्या शतकाच्या शेवटी जयवर्मा (दुसरा) याच्यामुळे राज्य स्थिरावले. ‘देवराज’ ही संकल्पना प्रचलित होती. राजा हा देवासमान मानत. सुरुवातीला विटा नि जांभा दगड वापरून, चौकोनी शिखरांची छोटी देवालये होती. हळूहळू गोपुरे, तटबंदी करत दगडाचा वापर वाढला. वालुकाश्म वापरून कोरीवकाम सुरू झाले. अर्थात, हे सर्व कोरीवकाम कमी उठावाचेच केले जात असे. पर्वतासारखे उंच किंवा पर्वतावरचे मंदिर ही कल्पना रुजली. शेवटी ख्मेर राजवटीच्या सुवर्णकाळात उत्कृष्ट कलाविष्काराचे हे विष्णू मंदिर निर्मोाण झाले.
तीन लाख मजूर आणि सहा हजार हत्ती यांच्या मदतीने 28 वर्षांत मंदिर पूर्ण झाले. सूर्यवर्माच्या मृत्यूनंतर हे त्याचे स्मारक मंदिर बनले. त्यानंतरचा काळ पुन्हा संघर्षाचा होता. टोन्ले सॅपच्या भीषण युद्धात चाम लोकांनी पराभव करून, अंगकोरवर ताबा मिळवला. 1178-1181 त्यांचे राज्य होते. जयवर्मा सातवा याने पुन्हा जिंकून घेतले. त्याची राणी इंद्रदेवी ही बौद्ध धर्माच्या महायान पंथाची अनुयायी असल्याने राजानेही तोच धर्म स्वीकारला. त्यामुळे विष्णुमूर्ती हलवून बुद्धमूर्ती स्थापन करण्यात आली. मूळ अष्टभुज विष्णुमूर्ती मंदिराजवळ पश्चिमेला पाहायला मिळते. गाभार्याच्या ललाटबिंबावर मात्र मूळ शेषशायी तसाच आहे. त्यामुळे आज हे एकत्रित बुद्ध-विष्णू मंदिर आहे, असं म्हणायला हरकत नाही. 1431 मध्ये ख्मेर राज्य लयाला गेल्यावर पुन्हा गोंधळाची स्थिती होती. पण, तरी ख्मेर मंदिराला विसरले नाहीत. बौद्ध भिक्षूही इथे आले. उपासना करीत राहिले.
मंदिराच्या मोठ्या ओवर्या आणि 600 मीटर लांबीचे प्रचंड मोठे शिल्पपट, हे या मंदिराचे मुख्य आकर्षण. रामायण, महाभारत, सागरमंथन, देवासुरसंग्राम, कृष्ण-विष्णू यांनी केलेला असुरांचा निःपात, राजा सूर्यवर्माची मिरवणूक अशी भव्य कथनशिल्पे मंदिरात आहेत. ही सर्व कमी उठावाचीच आहेत (बास रिलीफ). नुसती भव्य नव्हेत, तर त्यात बारीकसारीक तपशील अतिशय सुरेखरित्या कोरलेला दिसतो. सर्वांचा आढावा घेणे शक्य नाही; पण ठळक बाबी पाहूया.
वाली-सुग्रीव संघर्ष, हनुमानाने लंकेत घातलेला धुमाकूळ, राम-रावण युद्धातले दोन्ही बाजूंचे अनेक वीर, खुद्द राम-रावण सुरेख कोरले आहेत. कौरव-पांडव महायुद्धातही शरपंजरी भीष्म, कर्णाचे चाक रुतणे, गुरू द्रोणाचार्य, रथ, हत्ती, घोडे सर्व उत्तम दाखवले आहेत. वीरांचे पोशाख, त्यांची शस्रे, त्यांची अवस्था सगळेच बारकावे चांगले टिपले आहेत. एके ठिकाणी तर चाक आणि चाकाच्या पलीकडे पडलेला योद्धा असेही कोरले आहे. महाभारत सांगणारे व्यास आणि लिहून घेणारा गणरायही आहे. सागरमंथनात मध्यभागी कासवाच्या पाठीवर मंदार पर्वत आणि विष्णू, एकीकडे 88 देव तर दुसरीकडे 92 दानव आणि पाण्यात अनेक जलचर आहेत. कमाल अशी की, सागर घुसळल्यामुळे इजा झालेले, तुटलेले प्राणीसुद्धा कोरले आहेत. शिवाय एरवी यात न दिसणारे दोघे इथे आहेत. देवांच्या बाजूला चक्क हनुमान तर दानवांच्या बाजूला रावण आहे. हे त्या वेळच्या शिल्पकारांनी घेतलेले स्वातंत्र्य म्हणावे लागेल. देवासुरसंग्राम विशिष्ट असा कोणता घेतलेला नाही. त्यात बरेच देव आपापल्या वाहनांवरून आलेले पाहायला मिळतात. सूर्यवर्मा राजाची मिरवणूक अतिशय देखणी आहे. त्याचा डामडौल, मंत्री परिवार, पालख्यांमध्ये राण्या व राजस्त्रिया, चालणारे सेवक, हातातले ध्वज, परकीय लोक असे कितीतरी तपशील बघण्याजोगे.
कृष्ण-बाणासुर संघर्षात यादववीर, प्रद्युम्न, बलराम दिसतात. शिवाच्या सांगण्यानुसार कृष्णाने बाणासुरास सोडून दिले हे दिसते. हे कोरीवकाम मात्र तुलनेने कमी दर्जाचे आहे. स्वर्ग-नरक संकल्पना दाखवणारा 63 मीटर लांबीचा पट फारच प्रभावी आहे. यात वेगवेगळे 32 नरक आणि 37 स्वर्ग दाखवले आहेत. चांगल्या-वाईट कर्मांची फळे समजावणारा आणि सावध करणारा हा पट आहे. खिळ्यांनी ठोकणे, आगीत टाकणे, उलटे टांगणे अशा शिक्षांपासून अगदी टोकाच्या क्रूर यातनाही आहेत. स्वर्गाच्या दृश्यात विविध प्रासाद, सुखसोयी दाखवल्या आहेत. मंदिरातल्या सुमारे दोन हजार अप्सरांचा उल्लेख करायलाच हवा. एकही दुसरीसारखी नाही. वस्त्रे, अलंकार, केशरचना, शिरोभूषण, फुले काही ना काही वेगळे कोरण्याचा प्रयत्न केला आहे.
काळाच्या ओघात आणि युद्धांमुळे मंदिराचे नुकसान झाले. पण, 1970 पासून आणि आजही फ्रान्स, चीन, अमेरिका, भारत अशा विविध देशांच्या सहभागाने जतनाचे, संवर्धनाचे काम सुरू आहे. पर्यटकांच्या लोंढ्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होऊन मंदिराला धोका उत्पन्न होऊ नये, यासाठीचे प्रयत्नही जोडीने सुरू आहेत. समतोल साधून हा भारताबाहेरचा पण भारतीय असा विलक्षण वारसा टिकणे, टिकवणे महत्त्वाचे आहे.
डॉ. नीलिमा थत्ते
dr.n.thatte@gmail.com