महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्यावतीने देण्यात येणारा ‘बाया कर्वे पुरस्कार’ यंदा पश्चिम बंगाल दार्जिलिंग हिल्समधील पाणिघट्टा येथील रहिवासी आणि कांचनजंगा उद्धार केंद्र, सिलीगुडीच्या संस्थापक असलेल्या प्रिन्स उर्फ रंगूजी सौरिया- यांना जाहीर झाला आहे. महिला, अल्पवयीन मुली व मुले यांना लैंगिक शोषणातून मुक्त करण्याच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन, त्यांच्या या सामाजिक कार्याकरिता राष्ट्रीय स्तरावरील २८व्या ‘बाया कर्वे पुरस्कारा’ने माजी खासदार, प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेता डॉ. नितीश भारद्वाज यांच्या हस्ते आज, बुधवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी सायं ५.३० वाजता संस्थेच्या रमा पुरुषोत्तम विद्या संकुल, पुणे येथे रंगूजी सौरिया यांना सन्मानित करण्यात येणार आहे. एक लाख, एक हजार रुपये रोख व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यानिमित्ताने रंगूजी सौरिया यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा हा लेख...
मूळच्या पाणिघट्टा येथील रहिवासी असलेल्या रंगूजी सौरिया या दार्जिलिंग, ईशान्य भारत आणि नेपाळमधील लैंगिक तस्करी पीडितांना मदत करण्यासाठी समर्पित असलेल्या सिलीगुडी येथील ‘कांचनजंगा उद्धार केंद्रा’च्या माध्यमातून जवळ जवळ तीन दशके काम करीत आहेत.रंगूजी सौरिया यांचा जन्म पाणिघट्टा, जि. दार्जिलिंग, पश्चिम बंगाल येथील दार्जिलिंग हिल्समधील एका सामान्य कुटुंबात झाला. बिहार, ओडिशा, झारखंड, सिक्कीम, आसाम ही राज्य पश्चिम बंगालच्या सीमारेषेवर आहेत, तर नेपाळ व भूतान हे देश आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर आहेत. एकूण या राज्यांमधील/देशांमधील दारिद्य्र, शिक्षण व रोजगाराच्या संधी व महिला-मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन तपासल्यास, या भागातील महिला व मुलींची; अगदी कुटुंबातील स्थिती आपल्याला सहज लक्षात येऊ शकते. महिला व मुलींकडे उपभोगाची एक वस्तू म्हणून बघण्याची वृत्ती व यातून लैंगिक तस्करीसारख्या गुन्ह्याची निर्मिती व मशागत करण्यास असे प्रदेश व त्याला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमा या नेहमीच पूरक ठरत असतात. आज पश्चिम बंगालमध्ये लैंगिक तस्करीचे प्रमाण हे ३९ टक्के इतके आहे. महिला व मुलींची लैंगिक सुरक्षितता राखण्याकरिता आपल्याकडे अनेक कायदे अस्तित्वात आहेत. मात्र, अत्यंत सुसूत्रतेने चालणारे हे रॅकेट व कायद्यातील पळवाटा या गरीब, गरजू, निराधार, अशिक्षित मुलींचे शोषण रोखण्यास असमर्थ ठरतात.
आजूबाजूला महिला व मुलींचे लैंगिक शोषण होत असताना, आपण या पीडितांकरिता काही तरी केलेच पाहिजे, याची जाणीव व प्रबळ इच्छा रंगूजींना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होत असतानाच झाली व त्या या कामात सक्रिय होऊ लागल्या. महाविद्यालयात शिकत असतानाचं वय हे जबरदस्त हिंमत आणि ऊर्जेने भारलेलं वय असतं. तसेच परिणामांचा फारसा विचार न करता, झोकून देऊन काम करण्याचं हे वय. या वयात आपल्या मित्रमैत्रिणींना बरोबर घेऊन या कामाची रंगूजींनी सुरुवात केली. नेमकं काय करायचं, कसं करायचं, हे माहीत नसतानाही तस्करीच्या जाळ्यातून मुलींना सोडवलंच पाहिजे, या एकमेव जिद्दीने त्यांनी कामाचा श्रीगणेशा केला. तेव्हाचे मित्र आणि त्यांची बहीण आजही खंबीरपणे त्यांच्या सोबत आहेत, हे या कामातील भावनिक आधाराचे महत्त्वाचे सूत्र.प्रारंभीच्या काळात हा तस्करीचा प्रकार आहे, हे प्रशासनाला मान्यच नसल्यामुळे, गुन्हा नोंदवून घेतला जात नसे. मग पुढे जाऊन केस उभी राहणे, आरोपीला शिक्षा होणे या गोष्टी तर फार दूरच! प्रशासन, पोलीस यंत्रणेकडून तसेच मुलींच्या कुटुंबीयांकडून सहकार्य मिळविणे, त्यासाठी पूरक वातावरण तयार करणे, हेच या कार्यातील एक मोठे आव्हान असल्याचे रंगूजी सांगतात. आता परिस्थिती हळूहळू बदलते आहे. अनेक आव्हाने व प्रसंगी जीवावर बेतणारे प्रसंगही हे काम करताना त्यांनी अनुभवले. परंतु, या कामातील निष्ठा, कामावरील प्रेम व स्वत:वरील विश्वास त्यांना या कामात अधिकच धीट व खंबीर होण्यास पूरक ठरला.
२००४ मध्ये काठमांडू येथील अनुराधा कोईराला आणि टीम मैती नेपाळ यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी दार्जिलिंग, सिलीगुडी येथे या कामाला समर्पित ’कांचनजंगा उद्धार केंद्र’ सुरू केले. हळूहळू या कामाचे महत्त्व समाजालाही पटले. विशेष म्हणजे, आज रंगूजींचे काम पूर्णपणे लोकांच्या मदतीवर चालले आहे. अगदी सिलीगुडी येथे संस्थेची जी वास्तू उभी आहे, त्यासाठी सर्व साहित्य हे लोकसहभागातून प्राप्त झाले. अशा मदतीतून आपल्यालाही मानसिक बळ मिळतं आणि या कामाची गरज लोकांना पटते, याचे समाधान वेगळेच आहे, असे रंगूजी आवर्जून सांगतात.दार्जिलिंग हे चहाच्या मळ्यांसाठी जगप्रसिद्ध. आसपासच्या अनेक खेड्यापाड्यांत राहणार्या अल्पवयीन-तरुण मुली, महिला येथे कामाकरिता येतात. तसेच, पंचक्रोशीतील अनेक गावांमधील महिला व मुली रोजगाराच्या शोधात असतात. पण, कधी त्यांना नोकरीचे आमिष दाखवून, तर कधी चांगल्या आयुष्याची स्वप्ने दाखवीत, तर कधी अगदी लग्नाची वचने देत अथवा प्रेमाची भुरळ घालत; मुलींना अगदी सहजपणे लैंगिक तस्करीत (देह विक्रीय) अथवा बंधमजुरीत ओढले जाते व त्यांची विक्री होते. राज्याची अथवा देशाची सीमा ओलांडताच, या मुली सहसा पुन्हा कधीच दिसत नाहीत व इथूनच सुरू होते त्यांच्या आयुष्याची वाताहत!
अनेकदा मुलींना सोडविण्यासाठी रंगूजी पुणे, हैदराबाद, दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये गेल्या आहेत. तिथे आधी पाहणी करून, अशा मुली तिथे असल्याची खात्री करून, स्थानिक पोलिसांचे सहकार्य मिळवून हे जोखमीचे काम त्या करतात. यासाठी मानसिक धैर्य, संयम आणि समयसूचकता असलीच पाहिजे; जी रंगूजींकडे निश्चितच आहे. तसेच त्या त्या ठिकाणच्या सामाजिक संस्था, नेटवर्क्स, कार्यकर्त्यांशी उत्तम संपर्क व समन्वय हेही महत्त्वाचे सूत्र त्या जपतात. पुण्यातील बुधवार पेठेत अडकलेल्या अशा मुलींना सोडविण्यामध्ये फरासखाना पोलीस चौकीतील कर्मचार्यांचे उत्तम सहकार्य मिळते, याचाही त्या आवर्जून उल्लेख करतात. या सर्व कार्याकरिता आर्थिक पाठबळही भक्कम व नियमित लागते.अगदी त्वरित संभाव्य ठिकाणांवर (हॉटेल, रेल्वे/बस स्थानके, सीमारेषा ओलांडणार्या पायवाटा इ) लक्ष ठेवून या मुलींची सुटका करण्याचे काम रंगू आपल्या संस्थेमार्फत करतात. प्रामुख्याने सिक्कीम, उ. बंगाल आणि नेपाळमधील मुलींच्या सुटकेसाठी त्या प्रयत्नरत आहेत. अनेक मुली या आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडत अगदी अरब देशांत विकल्या जाण्याची उदाहरणेही त्या सांगतात. अशा मुलींना या चक्रव्यूहातून सोडविणे एक अवघड व तितकेच आव्हानात्मक काम. परंतु, रंगूजींनी अगदी सौदी अरेबियातील काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने २०११ मध्ये पाच किशोरवयीन मुलींना पुन्हा भारतात आणण्यात यश मिळविले होते.
रंगूजींचा या मुलींना देहव्यापाराच्या सापळ्यातून सोडवण्याचा निर्धार आणि त्याकरिता लागणारे शौर्य पाहून, त्यांना २०११ मध्ये ‘गॉडफ्रे फिलिप्स सोशल ब्रेव्हरी अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले होते. यापूर्वी त्यांना ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री’चा ‘वुमन अचिव्हर्स अवॉर्ड २००९’ नेदेखील सन्मानित करण्यात आले होते. आजपर्यंत रंगूजींना २०हून अधिक प्रादेशिक संस्थांकडून त्यांच्या या कार्याकरिता सन्मानित करण्यात आले आहे. महिला आणि बालविकास मंत्रालय, भारत सरकारच्यावतीने दरवर्षी भारतातील विशेष समाजकार्य करणार्या १०० निवडक महिलांना सन्मानित केले जाते. त्यात जानेवारी २०१६ मध्ये रंगूजींचा समावेश करण्यात आला होता.“हे काम करताना प्रकर्षाने जाणवले ते म्हणजे, या दुष्ट चक्रात मुली अडकूच नयेत; यासाठी प्रतिबंधात्मक कार्यक्रम करण्याचीही गरज आहे,” असे ठाम मत रंगूजी व्यक्त करतात आणि म्हणून त्यांनी प्रबोधनात्मक व प्रतिबंधात्मक कार्याची सुरुवात गावोगावी सुरू केली आहे. मुलींना सोडवून आणल्यावर त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांना व्यावसायिक शिक्षण, कौशल्ये शिकविणे, त्यांच्या उत्पादनांना बाजार उपलब्ध करून देणे या त्यांच्या काही आगामी योजना आहेत. आजपर्यंत रंगूजींनी ११०० हून अधिक महिला-मुलींना या दुष्टचक्रातून मुक्त केले आहे. यापुढेही हे कार्य करीत राहणार, असा ठाम निश्चय मांडणार्या रंगूजी सौरिया यांच्या कार्याला शतश: प्रणाम व वंदन!
‘बाया कर्वे पुरस्कारा’ विषयी...
१२५ वर्षांपूर्वी भारतरत्न महर्षी कर्वे यांनी पुण्यात स्थापन केलेल्या महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेच्या शताब्दी वर्षापासून म्हणजेच १९९६ पासून सामाजिक वा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांना ‘बाया कर्वे पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येते. समाजाच्या उत्थानाकरिता एखाद्या सामाजिक प्रश्नाचा पाठपुरावा करीत, त्या प्रश्नावर असामान्य व अद्वितीय असे प्रेरणादायी कार्य उभ्या करणार्या महिलांचा सन्मान यानिमित्ताने संस्थेमार्फत केला जातो. या कामासह, या महिलांनी या कार्य उभारणीत पेललेली आव्हाने व अडचणींची ही विशेष ओळख यानिमित्ताने समाजाला करून दिली जाते.
या पूर्वीच्या ‘बाया कर्वे पुरस्कारा’च्या मानकरी खालीलप्रमाणे-
गंगूताई पटवर्धन, निर्मलाताई पुरंदरे, विजयाताई लवाटे, डॉ. मंदा आमटे, नसिमा हुरजुक, पुष्पा नडे, प्रेमा पुरव, लीला पाटील, सुनंदा पटवर्धन, रेणू दांडेकर, डॉ. स्मिता कोल्हे, मीना इनामदार, सिंधुताई अंबिके, डॉ. माया तुळपुळे, पद्मजा गोडबोले, मीरा बडवे, अनुराधा भोसले, डॉ. संजीवनी केळकर, जयश्री काळे, सुवर्णा गोखले, सुनीता गोडबोले, चंद्रिका चौहान, रूषाताई वळवी, जया तासुंग मोयोंग.
- स्मिता कुलकर्णी
(लेखिका महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा आहेत.)