मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्षांसमोर जोरदार युक्तीवाद सुरू असताना, येत्या काही दिवसांत राहुल नार्वेकर राष्ट्रवादीच्या आमदारांसंदर्भातील सुनावणीलाही सुरुवात करणार आहेत. त्यासंबंधीचे वेळापत्रक तयार करण्याचे काम विधिमंडळ सचिवालयाकडून सुरू आहे.
शिवसेना आमदार अपात्रता याचिकांवर ३१ डिसेंबरपूर्वी, तर राष्ट्रवादीसंदर्भात ३१ जानेवारीआधी निर्णय घेण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना केली आहे. विधिमंडळ सचिवालयाने शिवसेनेसाठी नव्याने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार, २८ नोव्हेंबरपासून पुन्हा सुनावणीला सुरुवात होईल. तर, ११ ते २२ डिसेंबर या काळात सुट्या वगळता नागपुरातही सुनावणी सुरू राहणार आहे.
२८, २९, ३० नोव्हेंबर, तसेच १, २, ५ आणि ६ डिसेंबरला मुंबईतील विधानभवनात सुनावणी होईल. तर ११ ते १५ डिसेंबर आणि १८ ते २२ डिसेंबरपर्यंत नागपूरमध्ये शिवसेनेच्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या आमदारांसंदर्भात ३१ जानेवारीपूर्वी निर्णय घ्यावयाचा असल्याने शिवसेनेसोबत राष्ट्रवादीच्या आमदारांचीही सुनावणी घेण्यासंदर्भात वेळापत्रक तयार केले जात आहे.
'त्या' चर्चा फेटाळल्या
शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीच्या आमदारांसंदर्भातील सुनावणी पुढील आठवड्यात होणार असून, दोन्ही बाजूंकडून विधानसभा अध्यक्षांना उत्तर सादर करण्यात आले आहे. अजित पवार गटाकडून ४०, तर शरद पवार गटाकडून ९ जणांचे उत्तर सादर करण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विचारले असता, त्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. 'एकत्रित सुनावणी घेण्यासंदर्भात वेळापत्रक तयार करण्याचे काम सुरू असून, लवकरच ते जाहीर केले जाईल', अशी माहिती नार्वेकर यांनी 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली.